Sanjay Narvekar Bhramacha Bhopla Pune : मराठी कलाविश्वाची खरी ओळख जपण्यात नाटकाचा मोठा वाटा आहे. अनेक दिग्गज कलाकार आणि लेखक व दिग्दर्शक घडवणारी ही रंगभूमी आजही मराठी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग मानली जाते. मल्टीप्लेक्स आणि सिनेमांच्या दुनियेतही मराठी नाटकांनी त्यांचे वेगळेपण जपले आहे. कलाकारांना नाटकाच्या माध्यमातून जिवंत अभिनयाद्वारे प्रेक्षकांशी नाळ जोडणे शक्य होते. मराठी प्रेक्षकही नाटकांना आजही तितक्याच उत्साहाने आणि प्रेमाने भरभरून प्रतिसाद देतात. कलाकारांचा जिवंत अभिनय आणि रंगमंचावर अनुभवायला मिळणाऱ्या भावना यांमुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये नाटकाची जादू आजही कायम आहे.

एखादे नाटक सादर करण्यासाठी कलाकारांप्रमाणेच बॅक स्टेजची टीमही कष्ट घेत असते. ते नाटक रंगमंचावर यशस्वीरीत्या सादर केले जाण्यात पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा असतो. पण, पुण्यामध्ये वाहतूक कोंडीचा फटका नाटकाच्या प्रयोगाला बसल्याने प्रयोग सुरू होण्यास उशीर झाल्याचे दिसून आले. ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकाच्या प्रयोगाला वाहतूक कोंडीमुळे उशीर झाला. हडपसर येथील विठ्ठल तुपे नाट्यगृहात प्रयोगाला रात्रीचे १० वाजून गेले. यावेळी कलाकारांनी समजूतदारपणा दाखवीत नाटकाचा स्टेज उभारल्याचे दिसून आले आहे. संजय नार्वेकर यांच्यासह नाटकातील कलाकारांनीही समजूतदारपणा दाखवून नेपथ्याची उभारणी केल्याचे समोर आले आहे.

‘भ्रमाचा भोपळा’ नाटकातील कलाकारांनी उभारला सेट

‘नाटकवेडा मराठी माणूस’ या इन्स्टाग्राम पेजवरून कलाकारांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये नाटकामध्ये काम करणाऱ्या सर्व कलाकारांनी नेपथ्य उभारत, नाटकासाठी लागणारे सर्व फर्निचर आणि सेटअप लावल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये अभिनेते संजय नार्वेकर हे स्वतः स्टेजवरील नेपथ्यासाठी लागणारे सामान उचलून आणत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर ‘भ्रमाचा भोपळा’ नाटकातील इतर कलाकार विजय पटवर्धन, वरद चव्हाण, शुभंकर तावडे आणि अंकित म्हात्रे यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी नाटकाचे स्टेज उभारण्यासाठी मदत केली आहे.

पुण्यात वाहतूक कोंडीमुळे ‘भ्रमाचा भोपळा’ नाटकाच्या प्रयोगाला उशीर

हा व्हिडीओ शेअर करीत त्यांनी घडलेला प्रसंग, कलाकारांनी दाखवलेला समजूतदारपणा आणि प्रेक्षकांनी दाखवलेला संयम याचे कौतुक केले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं, “अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मिरवणुकांमुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीचा मोठा फटका रविवारी भ्रमाचा भोपळा या नाटकाच्या प्रयोगाला बसला. हडपसर येथील विठ्ठल तुपे नाट्यगृहात २ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मात्र, पुणे शहरात प्रवेश केल्यापासून नाटकाच्या साहित्याची बस तब्बल दोन तास एकाच ठिकाणी अडकून पडली होती. रात्री ९.३० वाजता अभिनेते संजय नार्वेकर, चेतना आणि इतर प्रमुख कलाकार कसेबसे नाट्यगृहात पोहोचले; पण नेपथ्य वेळेवर न आल्यामुळे नाटक वेळेत सुरू होणार नाही हे स्पष्ट झाले होते, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये थोडी अस्वस्थता पसरली. मात्र, अशा परिस्थितीत संजय नार्वेकर यांनी अत्यंत समजूतदारपणा दाखवीत थेट रंगमंचावर जाऊन प्रेक्षकांशी थेट संवाद साधला. प्रेक्षकांनीही कलाकारांना पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली.”

संजय नार्वेकरांसह इतर कलाकारांनी उभारला सेट

पुढे त्यात लिहिलंय, “अखेर रात्री १० वाजता नाटकाच्या सेटची बस नाट्यगृहाच्या आवारात पोहोचली. मात्र, तिथून पुढे सेट लावणं आणि तांत्रिक तयारी करण्यासाठी खूप वेळ जाणार होता. प्रयोग आणखी उशीर होऊ नये म्हणून संजय नार्वेकर, चेतना यांच्यासह नाटकाच्या सर्वच कलाकारांनी, बॅकस्टेज टीमसह सेटचे सामान उचलण्यास सुरुवात केली. सर्वांनी मोठ्या प्रमाणात घेतलेल्या सामूहिक मेहनतीमुळे अवघ्या काही मिनिटांत पडद्यामागची ही धावपळ यशस्वी ठरली आणि रात्री १०.४० वाजता नाटकाचा पडदा उघडला. वाहतूक कोंडीच्या या मोठ्या विघ्नावर कलाकारांची जिद्द आणि प्रेक्षकांच्या संयमामुळे मात करणे शक्य झाले आणि विठ्ठल तुपे नाट्यगृहातील ‘भ्रमाचा भोपळा’चा हा प्रयोग अखेर यशस्वीरीत्या पार पडला.”