Sankarsan Karhade Navratri Stotram Video: शारदीय नवरात्रोत्सव सुरू झाला असून, त्यानिमित्ताने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करीत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याच्या लहानपणीचा किस्सा शेअर केला आहे. संकर्षण कऱ्हाडेने त्याच्या आजोबांनी शिकवलेल्या स्तोत्राबद्दल माहिती दिली आहे. या स्तोत्रातून देवीची माफी मागितली जात असल्याचे त्याने सांगितले आहे.
संकर्षण कऱ्हाडे इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करीत म्हणाला, “लहानपणी आमच्या आजोबांनी घरातील सर्वांना एक स्तोत्र शिकवलं होतं. आपली एखादी चूक झाली, तर आपण आपल्या आईची माफी मागतो. खरं तर कधी कधी माफी मागतही नाही. हे देवीची क्षमा मागणारं स्तोत्र आहे. आमच्याकडून काही चुकलं असेल, तर आम्हाला माफ कर आणि आम्हाला पदरात घे, असा अर्थ असणारं हे खूप सुंदर स्त्रोत्र आहे.
देवीची क्षमा मागणारे स्तोत्र
त्यानंतर संकर्षण कऱ्हाडेने आद्य शंकराचार्य विरचित ‘देवी अपराध क्षमापन स्तोत्रम्’ सादर केले. देवीची क्षमा मागणाऱ्या या स्तोत्रातील संस्कृत श्लोक त्याने भक्तीभावाने म्हणून दाखवले. संकर्षण म्हणाला, “न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो, न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथाः। न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं, परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम्”.
पुढे तो म्हणाला, “हे स्तोत्र पुढे खूप मोठं आहे. त्यामुळे ते नक्की पूर्ण ऐका. नवरात्रोत्सवात देवीसमोर बसून हे स्तोत्र ऐका. आपल्याकडून काही चूक झाली असेल, तर देवीनं आपल्याला क्षमा करावी, या भावनेनं ते ऐका आणि स्वतःही म्हणण्याचा प्रयत्न करा.”
लवकरच संकर्षण कऱ्हाडेचा ‘आदि अनंत’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबाबत तो म्हणाला, “येत्या १२ नोव्हेंबरला माझा ‘आदि अनंत’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पहिल्यांदाच मी सिनेमा लिहिला असून, त्यामध्ये मी कामही केले आहे. अशोक सराफ यांच्याबरोबर मी काम केले असून, सिनेमाच्या पोस्टरला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलाय आणि असेच प्रेम देत राहा.
