Sankarshan Karhade on Shubhangi Gokhale: एकत्र काम करताना सहकलाकारांबरोबर नाती निर्माण होतात. अनेक कलाकार त्याबद्दल मोकळेपणाने बोलतात. संकर्षण कऱ्हाडे व शुभांगी गोखले हे एकमेकांना भाऊ-बहीण मानतात. आता ‘आदि अनंत’च्या प्रीमियरच्या वेळी त्यांनी एकमेकांबद्दल केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे.

“संकर्षणचा मला अभिमान वाटतो”

संकर्षण कऱ्हाडे म्हणाला, “आमच्या कुटुंबात आणखी एक व्यक्ती आहे. मी मुंबईत आल्यानंतर फार नाती तयार झाली नाहीत; पण गेल्या आठ-दहा वर्षांत ज्यांनी मला कधीही न चुकता, राखी पौर्णिमेला राखी पाठवली, त्या शुभांगीताई आहेत. त्यांच्याबरोबर मी एका नाटकात काम केलं आणि त्यांनी जो काही माझा धाकट्या भावासारखा सांभाळ केला. ‘कुटुंब कीर्रतन’, ‘नियम व अटी लागू’च्या शुभारंभाच्या प्रयोगाला आल्या. माझं कुठलंही काम असेल, सगळे प्रयोग येऊन पाहतात, चुकाही सांगतात, कानही पिळतात. तर त्याही माझ्या कुटुंबाचा भाग आहेत.”

शुभांगी गोखले म्हणाल्या, “संकर्षणचा कलाकार म्हणून प्रवास मी खूप आधीपासून पाहिला आहे आणि आम्ही खूप चांगले दोस्त आहोत. आम्ही खूप मस्ती केली आहे, मी त्याच्या खट्याळपणाला तेवढीच दाद दिली आहे. मला त्याची फार आठवण येते. सतत आठवण येते की, सध्या त्याचं काय चाललंय वगैरे. मला त्याच्या दोन-तीन गोष्टी फार आवडल्या होत्या. सिनेमा पाहताना ते जाणवतं.”

पुढे त्या म्हणाल्या, “संकर्षण इतकं समृद्ध आणि रसरशीत, भावनेनं भरलेलं जीवन जगतो. मुंबईत आल्यानंतर तो मला म्हणाला होता की, मी काम तर करतच आहे; पण मी आई-वडिलांशिवाय राहू शकत नाही. लवकर मोठं घर घेऊन मी माझ्या आई-वडिलांबरोबर राहणार आहे. तेव्हापासून तो जास्त माझ्या जवळचा झाला. सिनेमात जे वाक्य आहे की तुम्ही तुमची नाती सोडून यशाचा आनंद घेऊ शकत नाही. त्याचं बीज मी आधीच ऐकलं आहे. त्यामुळे तो माझा खूप लाडका आहे. त्याला हे संस्कार देणारे माझे जास्त प्रिय आहेत. त्याचे आई-वडील, भाऊ अधोक्षज आणि शलाका, मुले या सगळ्यांवर माझं खूप प्रेम आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “संकर्षणचा मला अभिमान वाटतो. काहीही विचित्र तडजोडी करून, मोजूनमापून कलाकृती करायची काही गरज नाही. आपण जसं जगतो, तसंच आपण मांडलं की, अशी सुंदर कलाकृती तयार होते.”

दरम्यान, संकर्षण कऱ्हाडेची प्रमुख भूमिका असलेला आदि अनंत हा सिनेमा १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.