Sankarshan Karhade Varshakali ekda tari gavakade jat ja New Marathi Poem : मराठी कलाविश्वातील अष्टपैलू अभिनेता म्हणून संकर्षण कऱ्हाडेने सिनेमा, टीव्ही मालिका आणि नाटक अशा सर्व माध्यमांत अभिनयाची छाप उमटवलीय. अभिनयाबरोबरच त्याच्या कवितांचाही मोठा चाहतावर्ग आहे. समाजातील परिस्थिती आणि दैनंदिन आयुष्यावर आधारित संकर्षणच्या कविता चाहत्यांना कायम आवडतात. आता त्याने नोकरीसाठी गाव सोडणाऱ्यांसाठी खास ‘वर्षाकाठी एकदातरी गावाकडं जातं जा’ ही नवीन कविता सादर केली आहे.
सामान्यांच्या मनाला भिडणाऱ्या आणि त्यांच्या व्यथा व कथा मांडणाऱ्या संकर्षणच्या कविता नेहमी लक्ष वेधून घेतात. यापूर्वी त्याने राजकीय परिस्थिती, मोठी होणारी मुलगी आणि खवय्यांसाठी अशा कविता लिहिल्या आहेत. सोशल मीडियावर त्याच्या कविता तुफान व्हायरल होत असतात. आता नोकरीसाठी गाव सोडून शहरामध्ये येणाऱ्या चाकरमानी लोकांसाठी संकर्षणने कविता सादर केली. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, दिग्दर्शक प्रवीण तरडे व अभिनेत्री स्नेहल तरडे उपस्थित असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
काय आहे संकर्षण कऱ्हाडेची कविता?
उंच उंच उडताना जमिनीकडे पाहत जा
आणि वर्षाकाठी एकदा तरी गावाकडे जात जा
गावाकडे आहे ते घर जिथे तू भोकांड पसरून रडायचा
धूळ-मातीत खेळताना तू ढोपरावरती पडायचा
अबे दुसऱ्याच्या लिंबा-बोरीवर चोरून तू चढला होता
तुझ्या पायात रुतलेला काटा आईने चटका देऊन काढला होता
आता ब्रॅण्ड बुटाबाहेर पडत नाही तुझा पाय
अन् १० हजार पावले वेड्या, तू मोजून टाकतो काय
उंच उंच उडताना जमिनीकडे पाहत जा
आणि वर्षाकाठी एकदातरी गावाकडे जात जा
गावाकडच्या घराचे नाव अमुक-अमुक निवास आहे
जिथे लिफ्ट नाहीये चढायला पण गच्ची लय खास आहे
तिथले शेजारी तुला न विचारता तुझा चहा टाकतात
तिथल्या डॉक्टरला जरी पाहिलं तरी तुला अर्ध बरं वाटतं
सिग्नल नसेल पेटत तिथला, कच्चा असेल रस्ता
पण अख्खा गाव ओळखीचाय, म्हणतात, बरंय का दोस्ता?
इथे ताटात जेवणारे तुझ्या, तुझ्या भरवशाचे नाहीत
लोकलमध्ये होतात खून अन् तू व्हिडीओ करतोय काय?
उंच उंच उडताना जमिनीकडे पाहत जा
आणि वर्षाकाठी एकदा तरी गावाकडे जात जा
आता स्वप्न पूर्ण करायला दोस्ता, तू सतत जागा राहतो
कष्टाने करतो पैसा उभा अन् फ्लॅटमध्ये जातो
पण कितीही मोठ्या टॉवरपुढे सडा टाकता येत नाही
अन् सोसायटीच्या मेंटेनन्समध्ये काय वासुदेव येऊन गात नाही
दरम्यान, संकर्षण कऱ्हाडेचे सूत्रसंचालन आणि कविता सादर करण्याची पद्धत नेहमीच चाहत्यांना आवडते. ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा त्याचा आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांचा कविता, गाणी आणि गप्पांवर आधारित कार्यक्रमसुद्धा होतो. सध्या संकर्षण कऱ्हाडे त्याच्या कुटुंब किर्रतन नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग करीत आहे.
