Sankarshan Karhade Salil Kulkarni Daughters Day Post: कन्या दिनानिमित्त मराठी कलाकारांनी त्यांच्या मुलींबरोबर खास फोटो शेअर केले आहेत. अनेकांनी मुलींबरोबरचे खास क्षण आणि आई-वडील म्हणून मुलांना वाढवताना आलेले अनुभव शेअर केले आहेत. यामध्ये अष्टपैलू लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनेही मुलीला ‘माकड आणि टोपीवाल्याची’ गोष्ट सांगताना खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याचबरोबर लोकप्रिय संगीतकार व लेखक सलील कुलकर्णी यांनीही मुलीसाठी भावुक पोस्ट लिहिली आहे.

संकर्षण कऱ्हाडेने कन्या दिनाच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर त्याची मुलगी स्रग्वीबरोबरचा व्हिडीओ शेअर केला. यामध्ये मुलगी व वडिलांमधील गप्पा-गोष्टींचा खास क्षण दिसून आला आहे. संकर्षण त्याच्या मुलीला माकड व टोपीवाल्याची गोष्ट सांगत आहे. भाषेवर प्रभुत्व असलेल्या संकर्षणची चिमुकली मुलगीही तितक्याच तत्परतेने त्याच्यामागे गोष्ट म्हणत आहे. संकर्षणने सांगितलेली गोष्ट स्रग्वी त्याच्यामागे अगदी अचूकपणे म्हणताना दिसत आहे.

संकर्षण कऱ्हाडेने मुलीबद्दल व्यक्त केले प्रेम

कन्या दिनानिमित्त हा मुलगी वडिलांच्या नात्याचा हळवा व्हिडीओ शेअर करत संकर्षणने लिहिले, “जागतिक कन्या दिवस…माझ्या लेकीला ती लहान असताना मी पहिली गोष्ट शिकवली होती. माझी पोरगी माझा जीव आणि प्राण आहे…”अशा शब्दांत संकर्षणने त्याचे प्रेम व्यक्त केले आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी व कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेता अभिजीत खांडकेकरने रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर एका नेटकऱ्याने लिहिले, “किती गोड! मराठी असं शिकवावं” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “संकर्षण, तुझी लेक खूप गोड आहे… दिसायला तुझ्या सारखीच आहे.”

याचबरोबर लोकप्रिय संगीतकार, गीतकार, गायक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सलील कुलकर्णी यांनीही कन्या दिनानिमित्त लेकीसाठी प्रेमळ पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी मुलगी अनन्याबरोबर लहानपणीचा फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. सलील कुलकर्णी यांनी लिहिले, “सतत कडेवर बसणारी.“बाबा… तू ये…तरच मी येणार…” म्हणणारी…बघता बघता बाबाचा आधार झालीस…आपली मुलगी बघता बघता आपल्या आईसारखी वाटते…वाटते कशाला …? आईच होते ती आपली. अनन्या, जागतिक कन्या दिनाचे खूप खूप आशीर्वाद.”

सलील कुलकर्णी यांची मुलगी अनन्या कुलकर्णी ही क्रिकेटपटू आहे. त्याचबरोबर तिला गाणं आणि वादनाचीही आवड आहे.