महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर आयुष्यात एकदा तरी काम करायचं, त्यांच्या सिनेमात किंवा मालिकेत लहानशी भूमिका करण्याची तरी संधी मिळावी असं कित्येक मराठी कलाकारांचं स्वप्न असतं. आता एका लोकप्रिय अभिनेत्याने पाहिलेलं असंच एक स्वप्न पूर्ण झालं आहे. त्या अभिनेत्याचं नाव आहे संकर्षण कऱ्हाडे. आपल्या अभिनयाने, लेखन कौशल्याने, तसेच वास्तववादी कवितांनी सर्वांची मनं जिंकून घेणारा संकर्षण आता अशोक सराफ यांच्याबरोबर एका सिनेमात झळकणार आहे.
अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त संकर्षण कऱ्हाडेने ही आनंदाची बातमी त्याच्या तमाम चाहत्यांना दिली आहे. तसेच एक खास पोस्ट शेअर करत संकर्षणने अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव त्याने सांगितला आहे. या चित्रीकरणाच्या प्रवासात निवेदिता ताईंची सुद्धा मोठी साथ लाभल्याचं संकर्षणने सांगितलं. “सिनेमाच्या शूटिंगच्या ३ दिवस आधी अशोक सरांना खूप बरं नव्हतं पण, निवेदिता ताईंच्या सहकार्यामुळे, त्यांनी सरांची व्यवस्थित काळजी घेतल्यामुळे चित्रीकरण सुरळीत पार पडलं…”, असं संकर्षणने पोस्टमध्ये सांगितलं आहे.
संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट
“मी कधीही नं पाहिलेलं स्वप्नं पूर्ण झालं…”
मला कधीही वाटलं नव्हतं की, मी सिनेमा लिहीन आणि त्यात अशोक सराफ सर काम करतील आणि मलाही त्यांच्याबरोबर कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याची संधी मिळेल…
हा सिनेमा त्यांच्याकडे वाचला आणि त्याच क्षणी त्यांनी होकार दिला… हे माझं भाग्य
या सिनेमाच्या निमित्ताने हा हिमालया एवढा नट अनुभवला…
वयाच्या ७९ व्या वर्षी कामाची प्रचंड ओढ, वेळेवर येण्याची शिस्त, विनोद सुचण्याचा त्यांचा वेग आणि खूप काही… फक्त अनुभवावं!
प्रत्येक शॉटनंतर हाताच्या पंजाची पाचही बोटं ताणून… डोळे मोठे करून त्यांच्या शैलीत विचारायचे…
“तू लिहिलंय तसं करतोय नं…? विचारलेलं बरं …” ( आणि डोळा मारायचे…)
हा सिनेमा जितका त्यांच्या काम करण्यामुळे उत्तम पूर्ण झाला, तितकाच निवेदिता ताईंच्या साथीमुळे घडून आला…
सिनेमाच्या शूटिंगच्या ३ दिवस आधीपर्यंत अशोक सरांना खूप बरं नव्हतं… पण ताईंनी त्यांची तब्येत सांभाळत कसं सगळं होईल याची अत्यंत काळजी घेतली… निवेदिता सराफ सिनेमा मध्ये नाहियेत पण त्यांच्यामुळे चित्रीकरण सुरळीत पार पडलं.
पुढच्या काही महिन्यात सिनेमा तुमच्या भेटीला येईल… घ्या सांभाळून…
अशोक सराफ सरांना तुम्ही अनेक वर्षं प्रेमाने डोक्यावर घेतलंतययय
मला तुमच्या हाताचं बोट धरून जरी चालवलंत तरी हा नट सुखावेल.
सिनेमा कधी येणार, नाव काय, प्रोमो, टिझर, म्युजिक वगैरे सगळं लवकरच तुमच्यासोर येईल …
लक्ष असू द्या मायबापहो…
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा अशोक सर!
दरम्यान, संकर्षणने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत या नव्या सिनेमासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच संकर्षण या सिनेमाची पहिली झलक चाहत्यांबरोबर शेअर करणार आहे.
