Sankarshan Karhade Sister Raksha Bandhan : अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा मराठी कलाविश्वातील एक लोकप्रिय व अष्टपैलू कलाकार आहे. त्याच्या मालिका आणि नाटकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देत असतात. सिनेमाबरोबर संकर्षणच्या वैयक्तिक आयुष्याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. संकर्षण आणि त्याचा भाऊ अधोक्षज कऱ्हाडे अनेकदा एकत्र दिसून येतात; पण नुकतीच या दोघांची बहीणसुद्धा दिसून आली आहे. रक्षाबंधनानिमित्त संकर्षणने खास त्यांच्या बहिणीचा फोटो शेअर केला आहे.

बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने कलाकारांनी त्यांच्या भावंडांबरोबर फोटो शेअर केले आहेत. संकर्षण कऱ्हाडेनेही आपल्या कुटुंबाबरोबर रक्षाबंधन साजरा करतानाचा सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांची बहीण संकर्षण आणि अधोक्षज या दोघांना राखी बांधताना दिसत आहे. घरच्या घरी अगदी पारंपरिक पद्धतीनं रक्षाबंधन साजरं करण्यात आलं असून, या फोटोमधून भावंडांमधील प्रेम आणि जिव्हाळा पाहायला मिळत आहे.

संकर्षणची रक्षाबंधनानिमित्त खास पोस्ट

संकर्षणच्या घरातील व्यक्तींच्या नावांवरून अनेकदा सोशल मीडियावर चर्चा रंगते. संकर्षण व अधोक्षज यांच्या बहिणीचे अगदी सोपे आणि सुंदर नाव आहे. स्नेहल असे त्यांच्या बहिणीचे नाव असून, रक्षाबंधनाचे फोटो शेअर करीत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. “आम्ही भावंडं… स्नेहल, संकर्षण, अधोक्षज. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!!!” असं लिहिलं आहे. विशेष म्हणजे या फोटोबरोबर त्यानं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील ‘फुलों का तारों का’ हे लोकप्रिय गाणंही लावलं आहे. त्यामुळे संकर्षणची ही रक्षाबंधनाची पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

संकर्षण आणि अधोक्षज हे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय सेलिब्रिटी भावंडांपैकी एक आहेत. दोघेही मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असून, त्यांच्या कामाला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. संकर्षणने आपल्या अभिनयाबरोबर स्वभाव आणि साधेपणामुळेही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. दोन्ही भाऊ एकत्र कुटुंबात राहत असल्यानं त्यांच्या कौटुंबिक नात्याबद्दलही अनेकदा चर्चा होताना दिसते.

दरम्यान, संकर्षण कऱ्हाडे सध्या त्याच्या ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकामुळे चर्चेत आला आहे. त्याचे संपूर्ण राज्यामध्ये नाटकाच्या प्रयोगांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच अधोक्षज कऱ्हाडेने झी मराठीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत ‘समीर निकम ऊर्फ पंटर पिंट्या’ ही भूमिका साकारली आहे. त्याशिवाय त्यानं ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतही ‘बंटी’ हे लक्षवेधी पात्र साकारलं होतं. सध्या तो ‘कमळी’ मालिकेत काम करीत आहे.