Sanskriti Balgude Sambhavami Yuge Yuge makeup : मराठी रंगभूमीवर सध्या पौराणिक कथांचे आधुनिक प्रयोग लक्षवेधी ठरत आहे. अशाच एका ‘संभवामि युगे युगे’ या नाट्यप्रयोगामुळे अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही चर्चेत आली आहे. नृत्य, अभिनय व कथाकथन यांचा सुंदर मिलाफ असलेल्या या प्रयोगात संस्कृती ही श्रीकृष्णाची भूमिका साकारत आहे. तिच्या पात्राची व्यक्तिरेखा जिवंत करणाऱ्या प्रभावी अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी ती स्वतः मेकअप करत असल्याची माहिती समोर आली आहे. कृष्ण रूप धारण करण्यामागील तिची मेहनत आणि तयारी दाखवणारा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला असून, त्याचीही सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

संस्कृती एडिट्स या इन्स्टाग्राम अकाऊंटने तिचा नुकताच ‘संभवामि युगे युगे’ या नाट्यप्रयोगामागील तयारीचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रीकृष्णाचे रूप धारण करण्यासाठी ती घेत असलेली मेहनत पाहायला मिळते. प्रयोग सुरू होण्यापूर्वी संस्कृती स्वतः तिच्या डोळ्यांचा मेकअप पूर्ण करताना दिसते. त्यानंतर कृष्णाच्या कपाळावरील चंदनाचा गंधही तिने स्वतः रेखाटला आहे. पायांत घुंगरू बांधणे, पायांना अलता लावण आणि प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत ती रंगमंचावर येण्यासाठी पूर्णपणे सज्ज होत असल्याचे दिसून येत आहे.

नाजूक मोरपिसांचा मुकुट व आकर्षक केशरचना

श्रीकृष्णाच्या मोहक रूपाला साजेसे दागिने, नाजूक मोरपिसांचा मुकुट व आकर्षक केशरचना यांमुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसतो आहे. नाट्यप्रयोगादरम्यान कोणताही दागिना किंवा अलंकार निसटून पडू नये, याची काळजीही ती घेत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते. धोतर, दागिने आणि संपूर्ण शृंगार पूर्ण केल्यानंतर संस्कृतीने साकारलेले श्रीकृष्णाचे मनमोहक रूप नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे.

श्रीकृष्णाच्या रूपात होणारे रूपांतर

विशेष म्हणजे, संपूर्ण मेकओव्हर पूर्ण झाल्यानंतर संस्कृतीने मेकअप रूममध्ये देवाची आरती करून त्याचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर नाट्यप्रयोगाला सुरुवात केली. श्रीकृष्णाच्या रूपात होणारे तिचे हे संपूर्ण रूपांतर आणि त्यासाठी घेतलेली मेहनत पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

नेटकऱ्यांनी केले संस्कृती बालगुडेच्या लूकचे कौतुक

अभिनेत्री संस्कृती बालगुडेने इन्स्टाग्रामवर शेअर करताना, ​अस्तित्व तिचे… रूप कान्हाचे! अशी कॅप्शन दिली आहे.’संभवामि युगे युगे’च्या तयारीचा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. नेटकऱ्यांनी संस्कृतीच्या लूकचे आणि त्यासाठी ती घेत असलेल्या मेहनतीचे आवर्जून कौतुक केले आहे. नेटकऱ्यांनी लिहिले आहे की, खूप खूप सुंदर आणि प्रभावी कृष्ण. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, भगवंत श्रीकृष्ण समोर आले आहेत, असे वाटते. फारच छान नाटक आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, तीन तासांच्या शोमध्ये कृष्णाची भूमिका साकारण्यासाठी मानसिकदृष्ट्या किती तयारी करावी लागत असेल, हॅट्स ऑफ…! अशा भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

‘देऊळ बंद २’ मध्ये झळकली संस्कृती

‘देऊळ बंद २’ या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटामध्ये अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने भूमिका साकारली होती. हा चित्रपट २१ मे २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात प्रदर्शित झाला. २०१५ मध्ये आलेल्या सुपरहिट ‘देऊळ बंद’ चित्रपटाचा हा सीक्वेल तब्बल ११ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीस आला असून, पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.