Savita Malpekar on Pravin Tarde: सविता मालपेकर यांनी ‘शिवा’ मालिकेत बाईआजीची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्या सावळ्याची जणू सावली या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. नुकत्याच त्या प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’मध्ये दिसल्या.

सविता मालपेकर या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखल्या जातात. सविता मालपेकर यांनी नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी प्रवीण तरडेंबद्दल वक्तव्य केले. प्रवीण तरडेंबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत, याबद्दल जाणून घेऊयात…

“तो जर सर्वांसमोर बोलला किंवा अपमान केला तरी…”

सविता मालपेकर म्हणाल्या, “प्रवीण स्पष्ट बोलतो. तो सेटवर शिव्या देतो अशा बऱ्याच गोष्टी त्याच्याबद्दल बोलल्या जातात, हे सगळं मान्य आहे. पण पहिली गोष्ट ही आहे की, तो लेखक आहे, तो दिग्दर्शक आहे. त्याच्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे मला वाटतं की, कुठलीही गोष्ट असते ना ते लेखकानं बघितलेलं स्वप्न असतं आणि ते स्वप्न लेखकालाच त्याच्या पद्धतीनंच उतरवायचं असतं. त्याच्यासाठी तो कष्ट घेत असतो. दुसरी गोष्ट ही असते की, त्याच्या डोक्यात असतं की या निर्मात्यानं माझ्या नावावर पैसे लावले आहेत. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कलाकार मोठा होतो; पण तोपर्यंत दिग्दर्शक काम करत असतो. ते सतत प्रवीणच्या डोक्यात असतं. तो ओरडतो; पण तो जर तुम्हाला सर्वांसमोर बोलला किंवा अपमान केला. तरी तो तितक्याच प्रेमानं तुम्हाला तुमचा सीन आवडला, तुमचं काम आवडलं, तर तितक्याच प्रेमानं जवळ घेतो आणि कौतुकही करतो. हे फार कमी लोक करतात.”

त्या असेही म्हणाल्या की, एखादं वाक्य इकडे-तिकडे झालं नाही पाहिजे याची तो काळजी घेतो. एखादं वाक्य, शब्द लिहिण्यामागे त्याचा काहीतरी विचार असतो. त्यामुळे ते वाक्य तुम्हाला त्या पद्धतीनंच बोलावं लागतं. म्हणूनच आज ‘देऊळ बंद २’ने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘मुळशी पॅटर्न’ हिट झाला. ‘फुलवंती’ चांगला झाला. सगळेच त्याचे सिनेमे चांगले चालले. हे सगळं करत असताना तो प्रचंड वेड्यासारखी मेहनत घेतो. तो सिनेमा करत असताना फक्त त्यामध्येच गुंतलेला असतो. तो जेवण-खाणं सगळं विसरतो, इतका तो त्याच्यात गुंतलेला असतो. त्याचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. शूटिंगदरम्यान असं कुठेही दिसणार नाही की, तो गप्पा मारतोय. तो कामाच्या वेळी कामच करतो. अशा दिग्दर्शकाबरोबर काम करताना कामाची वेगळी मजा येते. शिकायला मिळतं.

सविता मालपेकर पुढे म्हणाल्या, “माणूस म्हणून तर तो उत्तम आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. प्रवीण व स्नेहल यांच्याबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, इतके ते माणूस म्हणून चांगले आहेत. मी नेहमी म्हणते की, या जोडप्याला कोणाची दृष्ट लागू नये”, असे म्हणत सविता मालपेकर यांनी प्रवीण व स्नेहल तरडे यांचे कौतुक केले.