Sayaji Shinde’s Sahyadri Devrai : लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांनी मराठीसह हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत भूमिका साकारल्या आहेत. सयाजी शिंदे यांनी साकारलेले पात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून राहिले आहे. सातारा जिल्ह्यातील सयाजी शिंदे यांनी आधी रंगभूमी आणि नंतर चित्रपटसृष्टीकडे पावले वळवली. खलनायक आणि राजकीय व्यक्तींच्या भूमिका करून त्यांनी सिनेविश्वामध्ये वेगळी ओळख निर्माण केली. अभिनय क्षेत्रासह सयाजी शिंदे हे त्यांच्या पर्यावरण संवर्धन कार्यासाठी ओळखले जातात. त्यांनी गावागावांत जाऊन वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धन केले आहे. आपल्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी ही वृक्षलागवड केली असल्याचे सांगितले आहे.
सयाजी शिंदे यांचा “सह्याद्री देवराई” उपक्रम
अभिनेते आशीष विद्यार्थी यांच्या यूट्यूब चॅनेलवर सयाजी शिंदे यांनी त्यांच्या बालपणींच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच अभिनय क्षेत्रातील अनुभव आणि पर्यावरणसंवर्धनाची प्रेरणा कुठून मिळाली याबद्दल सांगितले आहे. सयाजी शिंदे यांच्या “सह्याद्री देवराई” या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन केले जाते. या मोहिमेद्वारे त्यांनी हजारो झाडांची लागवड केली असून गावागावांत जाऊन पर्यावरणाबाबत जनजागृती केली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांना मदतीचा हात दिला. महाराष्ट्रामध्ये विक्रमी वृक्ष लागवड केली आहे. यामागे त्यांची आई ही प्रेरणा असल्याचे सयाजी शिंदे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
सयाजी शिंदे यांना एका गावामध्ये आला अनुभव
अभिनेते सयाजी शिंदे यांनी झाडे लावण्याची सुरुवात कशी केली याबाबत सांगितले आहे. ते म्हणाले की, मी एका गावामध्ये लोकांशी बोलण्यासाठी गेलो होतो. तीन गावांच्या लोकांची ती सभा एका माळरानावर घेण्यात आली. दुष्काळ पडलेला असताना माळरानावर भरउन्हामध्ये ती सभा घेण्यात आली. मी पूर्णपणे दमलो होतो आणि प्रचंड ऊन लागत होते. तेव्हा मी विचारले की, गावामध्ये एक झाड नाहीये का जिथे ही सभा घेता आली असती. तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले की सर्व झाडे कापून टाकली आहेत. तेव्हा मी ठरवले की गाव सुधारण्याचे काम हे झाड लावून केले पाहिजे आणि झाडे लावण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली, अशी माहिती सयाजी शिंदे यांनी दिली.
हैदराबादवरुन रोपट्यांची खरेदी
पुढे ते म्हणाले की, त्यानंतर गावांमध्ये झाडे लावण्यास सुरुवात केली. हैदराबादवरून दोन ट्रक भरून झाडांची रोपे आणली. लाखो रुपयांची रोपटी मागवली आणि गावागावांमध्ये झाडे लावली. झाडे लावण्याच्या या उपक्रमातून देवराई ही संकल्पना पुढे आली. पूर्वी देवाच्या नावाने काही झाडे संरक्षित केली जायची. देवांसाठी रान अशी संरक्षित जंगले असायची. या देवराई संकल्पनेला पुढे घेऊन गेलो. २०१६ मध्ये आम्ही तीन गावांमध्ये लाखो झाडे लावली, अशी आठवण सयाजी शिंदे यांनी सांगितली आहे.
गावागावांमध्ये झाडे लावण्यासाठी त्यांनी आईची प्रेरणा घेतल्याचे सांगितले. सयाजी शिंदे म्हणाले की, मला माझी आई या जगामध्ये सर्वात जास्त जवळची आहे. देवापेक्षा माझे आईवर जास्त प्रेम आहे. आईनंतर माझे कोणी या जगामध्ये असेल तर ते झाड आहे, कारण गर्भामध्ये आईमुळे श्वास घेतला आणि बाहेर आल्यानंतर झाडांनी दिलेल्या ऑक्सिजनने श्वास घेतला, त्यामुळे आईनंतर जर काही मला सर्वात जवळचे असेल तर ते झाडे आहेत, असे त्यांनी सांगितले.
आईचा आत्मा मला आशीर्वाद देईल – सयाजी
पुढे ते म्हणाले, माझे संपूर्ण आयुष्य मी असेपर्यंत आईला जिवंत ठेवेन एवढा मी कोणी ताकदवान नाही. त्यावेळेस माझ्या आईचे ९२ वय होते. मला आयुष्यभर आईची माया जपायची होती, म्हणून मी आईची देशी झाडांच्या बी-बियाणांनी तुला केली. मी आईची बीज-तुला केली आणि तेवढी सगळी बियाणे मी महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवली. ही झाडे जेव्हा मोठी होतील, फळतील आणि फुलतील तेव्हा त्यामधून माझ्या आईचा आत्मा मला आशीर्वाद देईल. झाडांच्या सावलीतून, फळांमधून आणि फुलांमधून माझी आई आयुष्यभर माझ्यासह राहील म्हणून मी हे वृक्षरोपण केले असल्याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले आहे.
आईच्या स्मरणार्थ विक्रमी वृक्षारोपण
त्याचबरोबर हे वृक्षारोपण आता संपूर्ण महाराष्ट्रभर इतके वाढले आहे की सध्या ४८ जागांवर काम सुरू आहे. काही ठिकाणी हजारो तर काही ठिकाणी लाखो झाडे उगवण्यात आली आहेत. या झाडांची उंची २० ते २२ फूट उंच झाली आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्यासमोर या झाडांची वाढ पाहिली आणि मी आयुष्यभर माझ्या आईला पाहणार आहे, असे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले आहे. आईच्या स्मरणार्थ हे विक्रमी वृक्षारोपण केले असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले आहे.
