Usha Nadkarni on Trolling: ‘जसा बाप तसा पोर’, ‘उरुस’, ‘अगडबंब’, ‘हुप्पा हुय्या’, ‘देऊळ’, ‘वास्तव: द रिअॅलिटी’, ‘व्हेंटिलेटर’, ‘मोकळे आकाश’, ‘सिंहासन’, ‘माहेरची साडी’, अशा अनेक चित्रपटांतून ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. उषा नाडकर्णी यांची पवित्रा रिश्ता मालिकेतील भूमिका चांगलीच गाजली होती. त्यांनी या मालिकेत सविता ही भूमिका साकारली होती. ही मालिका २००९ ला प्रदर्शित झाली होती. चित्रपट, मालिकांबरोबरच उषा नाडकर्णी बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येदेखील दिसल्या होत्या. उषा नाडकर्णी बिग बॉस मराठी सीझन ३ मध्ये दिसल्या होत्या.

उषा नाडकर्णी त्यांच्या स्पष्टवक्तपणेसाठी देखील ओळखल्या जातात. त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे त्या चर्चेत असतात. त्यांनी नुकत्याच दिलेल्या काही मुलाखतींमध्ये बिग बॉसचा अनुभव सांगितला होता. त्याची चर्चा होताना दिसली.

आता उषा नाडकर्णी यांनी नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अनेक किस्से सांगितले, अनुभव सांगितले. तसेच मी रिटायरमेंट घेणार नाही, असेही त्या म्हणाल्या. या मुलाखतीत त्यांनी सोशल मीडियाबद्दल वक्तव्य केले.

” …वय वाढलं आहे”

मुलाखतीत त्यांना सोशल मीडिया विषयी विचारले, त्यावर त्या म्हणाल्या, “सोशल मीडिया हे वेड्या लोकांनी भरलेलं आहे. अनेकांना ट्रोल केलं जातं. तर मला असं वाटतं की कशाला बोलायचं? ज्यांना जे वाटतं ते करतात. बघायचं असेल तर बघायचं नाही तर राहू द्यायचं.”

पुढे त्या म्हणाल्या, “काही मुलाखतींमध्ये फोटो दाखवताना मी माझ्या नवऱ्याचे फोटो दाखवले नाहीत, त्यावर अनेकांनी नवरा कुठे आहे? असं लिहिलं होतं. ते मी वाचलं. तर मला प्रश्न पडला की तुम्हाला काय त्याच्याबरोबर दारू पिण्यासाठी बसायचं आहे का? तुम्हाला काय करायचं आहे? मी सुद्धा फेसबुक बघते, वापरते. पण, मला जर एखादी पोस्ट आवडली नसेल तर मी पुढे जाते.”

लोक आपल्याबद्दल बोलतात त्याचा दबाव स्वतःवर निर्माण होऊ देत नाही असे स्पष्ट करत उषा नाडकर्णी म्हणाल्या, “लोक आपल्याबद्दल बोलतात म्हणजे आपण मोठे झालो.” उषा नाडकर्णी या मुलाखतीत असे म्हणाले की भविष्यातही मला खूप काम करायचं आहे, मी निवृत्त होणार नाही. मी म्हातारी झाले नाही, फक्त माझं वय वाढलं आहे.”

दरम्यान, आता उषा नाडकर्णी आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.