Usha Nadkarni on working in her 80s: सध्या ‘राजा शिवाजी’ व ‘देऊळ बंद २’ हे सिनेमे थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहेत. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. आता या सिनेमांबरोबर आणखी काही मराठी सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये तुंबाडची मंजुळा हा एक सिनेमा आहे.

तुंबाडची मंजुळा या सिनेमात अनेक लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. उषा नाडकर्णी, मकरंद अनासपुरे, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, ओम भूतकर, अंशुमन विचारे असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. सध्या हे कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या निमित्ताने ते विविध मुलाखती देत आहेत. मुलांखतींमधील त्यांची वक्तव्ये सध्या चर्चेत आहेत.

उषा नाडकर्णी काय म्हणाल्या?

उषा नाडकर्णी यांनी ‘लेट्सअप मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मला सगळ्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतात आणि मी करते. आता इतकी वर्षे मी अभिनय करते, तर ते माझ्या अंगात भिनलंच असेल. मी अमुक प्रकारची आहे असे लोक माझ्याबद्दल बोलतात. पण, ते विचार करत नाहीत की हिने चौथीत असल्यापासून काम सुरू केलं. आता माझं वय ८० आहे. तरीही मी काम करत आहे, म्हणजेच मी नक्कीच चांगली आहे. मी वेळेत जाते, माझ्या मागण्या काही नसतात. मी माझं चोख काम करते. टेक वर टेक देत नाही, म्हणून मला काम मिळतं. बोलणारे लोक बोलतात”, असे म्हणत उषा नाडकर्णी यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.

उषा नाडकर्णी यांनी अनेक मराठी चित्रपट, हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या खलनायिकेच्या भूमिका गाजल्या. पवित्र रिश्ता मालिकेतील त्यांची सविता देशमुख ही भूमिका चांगलीच गाजली. त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. उषा नाडकर्णी बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमध्येदेखील सहभागी झाल्या होत्या, त्यावेळीदेखील त्यांनी सर्वांचे मन जिंकली होती.

आणखी एका मुलाखतीत सई ताम्हणकरने उषा नाडकर्णी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “आऊ (उषा नाडकर्णी)बरोबर मी पहिल्यांदा काम केलं आहे. तिचा सहवास, तिचे व्यक्तीमत्त्व मला खूप आवडते. ती जे काही आहे, ते तोंडावर बोलते. ती मागे बोलत नाही. मला असे लोक फार आवडतात. कारण- मी स्वत: तशी आहे. मला आऊबरोबर काम करायला मजा आली. कारण- मला असं वाटतं की अनुभव जास्त राहतो, टिकतो. बाकी यश-अपयश येतात-जातात. चांगले अनुभव जास्त जपले जातात.”

आता तुंबाडची मंजुळा सिनेमातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना आवडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.