Shalaka Pawar on Ashok Saraf and Prashant Damle: सिनेसृष्टीतील ज्येष्ठ, दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याचे अनेक कलाकारांचे स्वप्न असते. काहींचे हे स्वप्न पूर्णही होते. कलाकार अशा अनुभवांबद्दल सांगत असतात. आता अभिनेत्री शलाका पवारने एका मुलाखतीत अभिनेते प्रशांत दामले व अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

शलाका पवारने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिने तिच्या करिअरबद्दल माहिती देताना ‘फू बाई फू’चेही काही किस्से सांगितले. यदा कदाचित या नाटकातील सहकलाकार हे कुटुंबाप्रमाणेच असल्याचे अभिनेत्री म्हणाली. तसेच अभिनेत्री समीर चौघुलेंबरोबरच्या मैत्रीवरही तिने वक्तव्य केले. त्याबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अभिनेत्रीने वक्तव्य केले.

शलाका पवारने सांगितला प्रशांत दामले यांचा किस्सा

याच मुलाखतीत प्रशांत दामले व अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभवही तिने सांगितला. ती म्हणाली, “प्रशांत सरांबरोबर काम करायला खूप मजा यायची. तेव्हा माझी मुलगी लहान होती. त्यामुळे मी तिला बऱ्याचदा नाटकाला घेऊन जायचे. तिच्या केसाला लावायच्या क्लिप्स, तिचा डबा माझ्या पर्समध्ये असायचा. सुजाता जोशी ही आर्टिस्ट आहे आणि ती ते सगळं काढून प्रशांत सरांकडे द्यायची. एक गाणं होतं, ज्याच्यामध्ये मी व सर समोरासमोर येतो आणि गोल फिरतो व बाहेर जातो. तेव्हा सर ते स्टेजवर घेऊन यायचे. स्टेजवर मला दाखवायचे. मला असं व्हायचं की, हे घेऊन तुम्ही स्टेजवर कसे येताय? त्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा यायाची”, असे म्हणत अभिनेत्रीने हा किस्सा सांगितला.

शलाका असेही म्हणाली की, हे कलाकार मोठे आहेत आणि ते उगाच मोठे झाले नाहीत. ते दुसऱ्या कलाकारांना इतके सामावून घेतात. खूप समजावून सांगतात. मला असं वाटत नाही की, दुसऱ्याला करू देत नाहीत वगैरे; उलट ते समोरच्याला प्रोत्साहन देतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. मी सुदैवानं त्यांच्याबरोबर काम केलं. मी अशोक मामांबरोबरही काम केलं. अशोक मामांबरोबर काम करायलाही खूप मस्त वाटायचं.

अशोक सराफ यांच्याबद्दल अभिनेत्री म्हणाली…

अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत शलाका पवार म्हणाली, “मामा खूप शिस्तबद्ध पद्धतीनं काम करतात. ते पाठांतर करतात. मी मामांबरोबर काम केलेलं तेव्हा स्टेजवर गेल्यानंतर माझ्या समोरचं जे पात्र होतं, त्याचं नाव मी विसरले होते. कारण- मामांबरोबर काम करायचं तर थोडं दडपण होतं. मी गोंधळले होते. त्या गोंधळात मी त्यांचा पटकन हात धरला. त्यांना कळलं. त्यांनी मला धीर दिला. मग मी शांत झाले.”

ती असेही म्हणाली, “माझी मुलगी हास्या तेव्हा लहान होती आणि ते नेहमी म्हणायचे की, आईचं पिल्लू आलं, आईचं शेपूट आलं”, असे म्हणत अभिनेत्रीने अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला.