Shantanu Moghe on Priya Marathe incomplete wish : मराठी अभिनेत्री प्रिया मराठेच्या अकाली निधनाने संपूर्ण मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला होता. कर्करोगाशी धैर्याने झुंज देत असताना तिने अखेरचा श्वास घेतला; मात्र तिच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. तिच्या या आजारपणाच्या काळात तिला पती शंतनू मोघेने खंबीरपणे साथ दिली. अभिनेता शंतनू मोघे याने पुन्हा एकदा प्रियाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच पहिल्यांदा प्रियाच्या एका अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाचा उल्लेख केला आहे.
शंतनू मोघे याने ‘अभिजात मराठी फिल्मी’ या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याचे वैयक्तिक आयुष्य आणि सिनेविश्वातील अनुभव शेअर केले आहेत. श्रीकांत मोघे यांचा मुलगा असूनही त्याने सिनेविश्वामध्ये घेतलेली मेहनत आणि कामातून मिळालेला आनंद याबद्दलची माहिती शंतनूने सांगितली आहे. तो म्हणाला, “वडिलांच्या ओळखीमुळे नक्कीच मला निर्मात्यांचे नंबर मिळाले आणि माझा संपर्क वाढला. ज्या निर्मात्यांकडे जायचं होतं, ते वडिलांमुळे थोडं सहज झालं. त्यातही वडिलांनी फोन केला असता, तर सुरुवातीला एखादं काम मिळालं असतं; पण मला निर्मात्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी विश्वास निर्माण करायचा होता. कारण- मी काम करू शकतो, असं समोरच्यालाही वाटायला हवं. जर मला आयुष्यभर हेच करिअर करायचे असेल, तर निर्मात्यांच्या डोळ्यांत एक विश्वास दिसायला हवा.”
प्रिया खूप सुंदर आणि समजूतदार व्यक्ती – शंतनू
पुढे तो म्हणाला, “मी, माझे वडील, काका आणि बायको याच क्षेत्रातील असल्यामुळे सगळ्यांना या क्षेत्राबद्दल माहित होती. पुन्हा घरी आल्यावर त्यावर काय बोलणार म्हणून आम्ही वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायचो. माझं काम अनेकदा थांबत होतं आणि पुन्हा सुरू व्हायचं. जी काही कामं केली, ती खूप चांगली केली. पण जेव्हा नव्हतं तेव्हा घरी बसलो होतो. खूप काळ असा होता, जेव्हा काहीच काम हातामध्ये नव्हतं; पण मी आणि प्रियामध्ये यावरून कधीच वाद झाले नाहीत. या सगळ्यामध्ये प्रियाचा खूप मोठेपणा आहे. ती खूप सुंदर आणि समजूतदार व्यक्ती होती. तिनं सांभाळून घेतलं, नाही तर हे साध्या माणसाचं काम नाहीये. ती माझी बायको होती म्हणून नाही, तर तिनं खरंच खूप साथ दिली,”
पुढे शंतनूने बायको प्रिया मराठेची अपूर्ण राहिलेली इच्छा बोलून दाखवली. त्याने, “प्रियाचं एक स्वप्न अपूर्ण राहिलं आहे आणि ते म्हणजे प्रोड्युसर होण्याचं. ते मी नक्की पूर्ण करेन,” असे म्हणत शंतनू मोघे याने सिनेविश्वामध्ये निर्मिती क्षेत्रामध्ये उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
प्रिया मराठे व शंतनू मोघे यांची प्रेमकहानी
एका नाटकाच्या निमित्ताने शंतनू मोघे व प्रिया मराठे यांच्या नात्याची सुरुवात झाली होती. एकत्र काम करताना दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि कालांतराने त्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. अनेक वर्षे एकमेकांना समजून घेतल्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये विवाह केला. मराठी व हिंदी मालिकाविश्वात लोकप्रियता मिळवलेल्या प्रिया मराठेचे अवघ्या ३८ व्या वर्षी ३१ ऑगस्ट २०२५ रोजी कर्करोगामुळे (Cancer) निधन झाले. तिने मुंबईतील मिरा रोड येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
