Priya Marathe And Shantanu Moghe : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं ३१ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं. प्रिया अनेक वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. या आजारपणाच्या काळात तिला पती शंतनू मोघेने खंबीरपणे साथ दिली. प्रियाचं तिचे सासरे श्रीकांत मोघे यांच्याशी सुद्धा खूप छान नातं होतं. शंतनूने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वडील श्रीकांत मोघे आणि प्रिया यांच्या आठवणी सांगितल्या आहेत.

“बाबाने मला विचारलं, प्रिया मराठे ना?”

शंतनू ‘अभिजात मराठी फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींविषयी बाबाला माहिती होतं. याशिवाय, माझ्या नाटकाचे प्रयोग कुठे-कुठे असायचे हे सुद्धा बाबा स्वत: माहिती करून घ्यायचा. या सगळ्यात गंमत अशी की, माझं आणि प्रियाचं जेव्हा ठरलं, आता आपण कसं सगळं अगदी फिक्स ठरल्याशिवाय घरी काही सांगत नाही. त्यादरम्यान, मी एकदा पुण्याला गेलो होतो आणि बाबा मला बोलला, ‘अरे अभिनंदन’ मी म्हटलं, ‘अरे काय झालं? मला तर नवीन प्रोजेक्ट वगैरे काहीच मिळालेलं नाहीये मग अभिनंदन कशासाठी?’ यावर बाबाने विचारलं, प्रिया मराठे ना?”

priya marathe
प्रिया मराठे, शंतनू आणि श्रीकांत मोघे यांचा फोटो ( सौजन्य : लोकसत्ता संग्रहित )

आयुष्य जगायला बाबाने शिकवलं…

“पुण्यात राहून बाबाला प्रियाबद्दल समजलं होतं.. मी शॉकच झालो, म्हटलं याला पुण्यात राहून कसं काय समजलं? असं सुंदर आमचं नातं होतं. तू बस आणि मी तुला चार गोष्टी शिकवतो असं कधीच झालं नाही. पण, बाबा नेहमी माझ्या पाठिशी होता. आज मी ज्या ताकदीने उभा आहे…ही सगळी त्याची शिकवण आहे. आयुष्य कसं जगायचं हे मला त्याने शिकवलं. एक आयुष्य आपल्याला देवाने दिलंय आणि हे सोडून जाताना…मी करून दाखवलं ही भावना हवी. हे सगळं जगणं बाबाने शिकवलं. अर्थात आईचा सुद्धा मला तेवढाच सपोर्ट होता.” असं शंतनूने सांगितलं.

प्रिया अन् शंतनूची लव्हस्टोरी

शंतनू लव्हस्टोरी सांगत म्हणाला, “या सुखांनो या’ मध्ये प्रिया आणि मी आम्ही दोघांनी काम केलं होतं, पण आमचा एकत्र ट्रॅक नव्हता. म्हणजे, तिची भूमिका संपली आणि मग मालिकेत माझी एन्ट्री झाली होती. परत, ‘चार दिवस सासुचे’ मालिकेतही आमचा एकत्र ट्रॅक नव्हता. तेव्हा तिची हिंदी सिरियल असल्यामुळे तिने ‘चार दिवस…’ मधून ब्रेक घेतला आणि त्यानंतर शोमध्ये माझी एन्ट्री झाली होती. आमची ओळख झाली ती आमच्या मित्रांमुळे, आमचे बरेच कॉमन मित्र होते. शर्वरीची प्रिया रूममेट होती. मी आणि शर्वरीने ( शर्वरी लोहकरे ) बरंच एकत्र काम केलं होतं. नंतर प्रियानेच मला प्रपोज केलं होतं.”

शंतनू पुढे म्हणाला, “लग्नाआधी सुद्धा जेवढा वेळ आम्ही एकत्र होतो, तो सहवास खूप छान होता. यातही पैसा, तू काय करतोस, तू किती यशस्वी आहेस, कसा दिसतोस असं काहीच नव्हतं. दिल से दिल का कनेक्शन असं आमचं नातं होतं. आमचे विचार, मनं जुळली होती.”

शर्वरीकडून नंबर घेतला अन् प्रियाला फोन केला…

“प्रिया तेव्हा हिंदी कॉमेडी सर्कस शोमध्ये काम करायची. मी तेव्हा तिला ओळखत नव्हतो. म्हणून मग मी शर्वरीकडे प्रियाचा नंबर मागितला. तिने मला विचारलं की, कशाला पाहिजे वगैरे. पण, मला तिला हिंदीच्या मंचावर पाहूनच भारी वाटलं होतं. मग, नंबर मिळाल्यावर मी तिला फोन केला. म्हटलं आपण दोन मिनिटं बोलू शकतो का? यावर प्रिया म्हणालेली, ‘नाही मी गाडी चालवतेय’ मी पुढे विचारलं, ‘दोन मिनिटं गाडी बाजूला घेता येईल का?’ तिने गाडी बाजूला घेतली. मी मग तिला म्हटलं, ‘मॅम मला एवढंच सांगायचं होतं की, मला खरंच कॉमेडी सर्कस पाहून भारी वाटलं. एक मराठी अभिनेत्री तिथे गाजवतेय. म्हटलं मला लय भारी वाटलं. ऑल द बेस्ट…गॉड ब्लेस यू!’ नंतर आम्ही शर्वरीच्या घरी भेटलो आणि मग आमच्यात बोलणं सुरू झालं. तिचे विचार इतके सुंदर होते ना…कमाल! प्रियासारखी कुणीच नाही. मग, आमच्यात खूप बॉण्डिंग झालं, पुढे मग लग्न झालं.” असं शंतनूने सांगितलं.