काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी’ आडनावावर केलेल्या टिप्पणीवरून सूरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर २४ तासांतच लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना अपात्र ठरवलं. यानंतर देशात मोठा गदारोळ सुरू असून, राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता अभिनेते शरद पोंक्षे यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पोंक्षेंनी ‘टीव्ही ९’ शी बोलताना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींचा एकेरी उल्लेख करत शरद पोंक्षे म्हणाले, “राहुल गांधी पहिल्यांदा सावरकरांबाबत बोलले असं नाही. जेव्हापासून ते राजकारणात आले तेव्हापासून ते सावरकरांवर चिखलफेक करत आहेत. त्यांच्याबद्दल बोलण्याचा मला कंटाळा आला आहे. एक तर सावरकरांनी आयुष्यात कधीही माफी मागितली नाही, हे सावरकरांवर व्याख्यान देणारे आणि त्यांच्या वंशजांनीही सांगितलं आहे. ‘दयेचा अर्ज’ असं त्याला म्हणतात, हे अनंत वेळा सांगून झालं आहे. पण ही राहुल गांधी आणि त्यांची टीम ही झोपेचं सोंग घेतलेले लोक आहेत”.

हेही वाचा>> Big Bang Theory: माधुरी दीक्षितला “वेश्या” म्हणणाऱ्या अभिनेत्याला जया बच्चन यांनी सुनावलं, म्हणाल्या “त्याला..”

“कितीही पुरावे, कागदपत्रे तुम्ही दाखवली, तरीही ते हे मान्य करणार नाहीत. हिंदुत्व बदनाम कसं करायचं आणि हिंदुत्ववादी नेत्यांवर चिखलफेक कशी करायची, हा त्यांचा अजेंडा आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा एक साधा सेवक २०१४ साली देशाचा पंतप्रधान झाला. त्यानंतरही २०१९च्या निवडणुकीत विरोधकांकडून प्रयत्न करूनही नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. म्हणून ऊठसूट सावरकरांवर ते टीका करत आहेत,” असंही पुढे ते म्हणाले.

हेही वाचा>> Video: …अन् खासदार सुजय विखेंबरोबर थिरकला गौरव मोरे, व्हिडीओ तुफान व्हायरल

पुढे राहुल गांधींचा एकेरी उल्लेख करत ते म्हणाले, “महात्मा गांधी व राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधी यांनीही सावरकरांचं कौतुक केलं आहे. सावरकर नाही मी गांधी आहे, असं राहुल गांधी म्हणतात. राहुल गांधी महात्मा गांधींबरोबर संबंध जोडण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना महात्मा गांधींच्या नखाचीही सर नाही. गांधी हे महात्मा होते. सावरकर व हिंदुत्ववाद्यांना टार्गेट करणं ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे. पुन्हा सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने दाबून ठेवलेले राम मंदिर, कलम ३७० हे सगळे प्रश्न मोदींनी सोडवायला सुरुवात केली. त्यामुळे आता सगळ्यांना भीती आहे. हिंदू शब्दाची दहशत आहे. या दहशतीमुळेच हे बरळणं सुरू आहे. पण काही माणसं रेटून खोटं बोलत राहिली तर ते पुढच्या पिढीला खरं वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे यांना उत्तर देणं गरजेचं आहे.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad ponkshe on congress leader rahul gandhi statement on veer savarkar kak
First published on: 28-03-2023 at 18:35 IST