Sharad Ponkshe On Pune Nasrapur Incident: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली. या क्रूर घटनेवर प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. “त्या नराधमाला भर चौकात लोकांच्या हातात सोपवा, लोकच न्याय करतील,” अशा कडक शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी लव्ह जिहाद आणि महिलांवरील वाढत्या अत्याचारावरही भाष्य केले आहे. या घटनेमुळे पुण्यात तणावाचे वातावरण असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांनीही या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. या नराधमाला भर चौकात लोकांच्या हातात सोपवा, असं त्यांनी म्हटलं आहे.
नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या मुलीवर एका गोठ्यात अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने त्या चिमुकलीला दगडाने ठेचून मारले. आरोपीने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरला. या धक्कादायक घटनेबद्दल समजताच परिसरातील लोक संतापले. या घटनेबद्दल सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेते शरद पोंक्षे यांनीही यासंदर्भात पोस्ट केली आहे.
शरद पोंक्षे नसरापूर प्रकरणावर काय म्हणाले?
“नराधमाला भर चौकात लोकांच्या हातात सोपवा. लोक न्याय मिळवून देतील, पण असं होणार नाही. गुन्हेगाराला शिक्षेची भितीच नाही. हा गुन्हेगार या आधीही असाच सुटला होता, परत तेच तेच तेच रोज बलात्कार, लव्ह जिहादच्या जाळ्यात आमच्या माता भगिनी भरडल्या जातायत. अत्यंत असहाय्य आहोत आम्ही. सुचत नाही,” अशी पोस्ट शरद पोंक्षे यांनी फेसबूकवर केली आहे.
या अत्याचार प्रकरणाचे नसरापूर परिसरात संतप्त पडसाद उमटले. मुलीचा मृतदेह धायरी परिसरात आणण्यात आला. त्यानंतर नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली, तसेच आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. आरोपीविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वास मिळत नाही, तोपर्यत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. त्यानंतर नातेवाईक आणि नागरिकांनी वडगाव उड्डाणपुलावर रास्ता रोको आंदोलन केले.
