अभिनेते शरद पोंक्षे त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त व्याख्यानांसाठी ओळखले जातात. अनेक विषयांवर ते त्यांची मतंही मांडत असतात. नुकताच त्यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी वीर सावरकर फक्त कर्माधिष्ठित जाती मानायचे, असं म्हटलं आहे. या व्हिडीओत त्यांनी पतित पावन मंदिराचाही उल्लेख केला आहे.
हेही वाचा – अरशद वारसीच्या मुलीला पाहिलंय का? खूपच सुंदर दिसते ‘सर्किट’ची लेक, फोटो व्हायरल




व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे म्हणाले, “चांगला माणूस व वाईट माणूस अशा दोनच जाती असतात. समाजात ज्या अठरापगड जाती आहेत, त्या सगळ्या व्यवसायाधिष्ठित जाती आहेत. मी जन्म कुठे घ्यायचा हे माझ्या हातात नाही, पण कर्माने मी कोण होतो, हे फार महत्त्वाचं आहे. वीर सावरकर कायमच कर्माधिष्ठित जाती मानायचे, जन्माधिष्ठित जातींना सावरकरांनी कडाडून विरोध केला,” असंही पोंक्षे यांनी नमूद केलं.
यावेळी ते रत्नागिरीतील पतित पावन मंदिराचा उल्लेख करत म्हणाले, “सावरकर कर्माधिष्ठित जाती मानायचे, म्हणूनच एका दलिताच्या हातून लक्ष्मी-नारायणाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली व रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिराची स्थापना केली. त्यानंतर या महाराष्ट्रात दुसरं पतित पावन मंदिर कुणीच उभं केलं नाही.”