Raja Shivaji Movie : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाला पहिल्याच वीकेंडला बॉक्स ऑफिसवर भरघोस यश मिळालं आहे. मराठीसह हिंदी सिनेविश्वातील दिग्गज कलाकार रितेश अन् त्याच्या संपूर्ण टीमचं भरभरून कौतुक करत आहेत. आपल्या महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहताना असंख्य प्रेक्षकांना अश्रू अनावर होत असल्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल आहेत. अशातच लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरने शेअर केलेला एक खास व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहून शशांकच्या गोंडस अशा पाच वर्षांच्या मुलाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
अभिनेता शशांक केतकरच्या मुलाचं नाव आहे ऋग्वेद. तो अवघ्या पाच वर्षांचा आहे. पण, एवढ्या लहान वयातही त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेबद्दल सगळं काही माहिती आहे. त्याला शिवरायांच्या गोष्टी ऐकायला आवडतात. ऋग्वेदकडे खेळण्यातली तलवार, ढाल सुद्धा आहेत. जेव्हा ऋग्वेदला समजलं की, ‘राजा शिवाजी’ सिनेमा पाहायला जायचंय. तेव्हा त्याने आपल्या बाबाकडे खास विनंती केली होती. यानुसार छोटा ऋग्वेद बाल शिवरायांची वेशभूषा करून चित्रपट पाहायला गेला होता.
शशांक केतकर म्हणतो, “जय शिवराय! आम्ही आता ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा पाहायला जात आहोत. अर्थात, ठाण्यात आम्ही या चित्रपटाचा मराठी शो बघायला जातोय. माझा मुलगा ऋग्वेद… महाराजांच्या शौर्यगाथा ऐकून इतका प्रेरित झाला आहे की, सकाळी उठल्यावर ते अगदी रात्री झोपेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी त्याला ऐकायच्या असतात. त्याला महाराजांच्या गड-किल्ल्यांबद्दल जाणून घ्यायचं असतं. त्याच्याकडे खेळणी सुद्धा सगळी अशीच आहेत. दिवसभर खेळण्यातली तलवार, ढाल घेऊन तो खेळत असतो. आता त्याला जेव्हा समजलं की, आज आम्ही हा सिनेमा पाहायला जातोय… त्यावेळी त्याने मला एक विनंती केली. ही विनंती काय आहे तुम्हीच पाहा…हे बघा, आमचा बाळशिवाजी तयार आहे!”
या व्हिडीओमध्ये शेवटी ऋग्वेद ‘जय भवानी, जय शिवाजी!’ असं म्हणत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे शशांकने आपल्या मुलावर किती छान संस्कार केलेत अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत. या व्हिडीओमध्ये शशांकने रितेश देशमुखला देखील टॅग केलं आहे.
“आशा आहे की, रितेश सर तुमच्यापर्यंत हा व्हिडीओ पोहोचेल…आमचे बाल शिवाजी! छत्रपती शिवाजी महाराज की जय!” असं शशांकने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, शशांकने शेअर केलेल्या व्हिडीओवर अभिजीत खांडकेकर, कपिल होनराव, किशोरी अंबिये, संग्राम समेळ अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करत ऋग्वेदचं कौतुक केलं आहे. सध्या शशांक ‘मुरांबा’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शिवानी मुंढेकरने देखील ‘राजा शिवाजी’ सिनेमात लहानशी भूमिका साकारली आहे.
