Shashank Ketkar upcoming movie: अभिनेता शशांक केतकर हा आतापर्यंत अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. त्याने मराठी चित्रपटांतदेखील काम केले आहे. सध्या तो मुरांबा मालिकेत काम करत आहे. आता लवकरच तो कैरी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आता या सगळ्यात अभिनेत्याने नुकत्याच एका मुलाखतीत कैरी सिनेमाबद्दल, वर्षानुवर्षे टेलिव्हजन माध्यमात काम केल्याबद्दल तसेच मुरांबा मालिकेबद्दलही वक्तव्य केले आहे.
शशांक केतकर म्हणाला…
कैरीच्या संपूर्ण टीमने नुकतीच लेट्सअप या चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, “कैरी सिनेमाचा प्रवास खूपच छान आहे.” पुढे तो मुरांबाबद्दल म्हणाला, “सध्या मी मुरांबा मालिकेत काम करत आहे. त्याआधीही मालिका काम केले आहे. त्यामुळे सतत चांगलं काम करत राहणं महत्वाचं आहे.
“पहिलं चांगलं काम झाल्यानंतर आपली जबाबदारी वाढते की तेच सातत्य पुढेही ठेवणं गरजेचं आहे आणि माझ्या नशिबाने खूप चांगली प्रोडक्शन हाऊसेस, खूप चांगल्या वाहिन्या, खूप चांगले दिग्दर्शक, लेखक, सहकलाकार मला मिळत गेले. त्यामुळे मी मा अत्यंत स्वार्थी म्हणून स्वत:ला एक उत्तर असं देऊन ठेवलं आहे की प्रत्येकाने आपापलं क्षेत्र आणि आपला प्रेक्षकवर्ग ओळखायचा असतो.”
“तर प्रेक्षकांनी ठरवून ठरवलेलं असतं की काही कलाकारांचे चेहरे चित्रपटांसाठी, काहींचे टीव्हीसाठी, काहींचे हे नाटकासाठी आहेत. तर टेलिव्हजन ही अशी जागा होती की कदाचित जिथे मी स्वत:ची जागा निर्माण करू शकलो असेन. म्हणून मी स्वत:ला सांगितलं होतं की असं एक क्षेत्र आपल्याला हवं की टेलिव्हिजनसाठी एक हुकुमी चेहरा आणि हुकुमी नाव असलं पाहिजे की कमीत कमी ५००-६०० एपिसोड करायचे तर शशांक केतकर हे नाव लोकांच्या तोंडी यायला हवं. तर अशी जागा निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे.”
पुढे तो म्हणाला की कैरीच्या संपूर्ण टीमकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. हे सगळं करता करता जेव्हा चांगले चित्रपट येतात. चांगले दिग्दर्शक ते काम बघून विश्वास ठेवतात की यामध्ये काम करण्याची ताकद आहे. अशा पद्धतीने चांगले चित्रपट येतात, तेव्हा आपण ती संधी दोन्ही हातांनी स्वीकारायची असते. मी ती संधी स्वीकारली. माझ्यासाठी कैरी ही वेगळी भूमिका आहे.
दरम्यान, हा सिनेमा १२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
