राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने परवाना मिळवण्यासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे सक्तीचे केले आहे. मात्र, अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी याला कडाडून विरोध दर्शवला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ विविध चालक संघटनांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. हा संप ४ मे पासून सुरू होणार आहे. संघटनांच्या दाव्यानुसार, या आंदोलनात राज्यभरातील सुमारे १५ लाख चालक सहभागी होऊन रस्त्यावर उतरतील. याचदरम्यान अभिनेता शिव ठाकरेने केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शिव ठाकरेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने सर्वांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ४ मे पासून संप होणार असल्याने त्याची गाडी जिथे कुठे दिसेल, तिथे हक्काने थांबवण्यात यावी, असं त्याने म्हटलं आहे. इतकंच नाही तर शिवने गाडीचे नाव व नंबर देखील सांगितला आहे. जेणेकरून त्याची गाडी ओळखता येईल.

शिव ठाकरेची पोस्ट

शिव ठाकरेने लिहिलं, “राम राम महाराष्ट्र, ४ मे रोजी टॅक्सी ड्रायव्हर्सचा संप आहे. तरीही आपल्या सेवेत तुम्हाला कुठेही MH 27 DK 0909 (टाटा हॅरियर) ही तुमच्या हक्काची टॅक्सी, रिक्षा दिसल्यास हक्काने थांबवणे. आपली खूण एकच – गाडीच्या पाठीमागे जय महाराष्ट्र आणि ड्रायव्हर सीटवर भगवा फेटा असलेला दादा आपल्या सेवेस सदैव तत्पर..
काहीही हो.. मराठी माणूस थांबता कामा नये. तुमचा आपला माणूस शिव ठाकरे.”

shiv-thakare-marathi-manus-taxi-strike-support-post
अभिनेता शिव ठाकरेची पोस्ट

शिव ठाकरेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. टॅक्सी व रिक्षा चालक संपावर गेल्यानंतर त्याच्या गाडीला लोकांनी हक्काने थांबवावं, ड्रायव्हर त्यांच्या त्यांना जिथे जायचंय तिथे सोडेल, असं शिव ठाकरेने जाहीर केलंय. शिवने मराठी माणसांच्या मदतीसाठी केलेल्या या आवाहनाचं खूप कौतुक होत आहे.

मराठी सक्तीच्या या निर्णयाला अनेक मराठी कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमे यानेही पोस्ट केली होती. “१५ लाख आहेत म्हणजे.. मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय? एक काम करा म्हणावं.. जिथे जमणार आहात तिथून तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा. तिथे कमवा आणि खा. महाराष्ट्रात मराठी बोला. शिका, प्रयत्न करा,” अशी पोस्ट हेमंत ढोमेने केली आहे.