ज्येष्ठ अभिनेने नाना पाटेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी रवींद्र नाट्यमंदिर येथे ‘आठवणीतले नाना’ या भावपूर्ण शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या आदरांजली सभेला अनेक मान्यवर उपस्थित होते. नानांनी कठीण काळात केलेली मदत, त्यांचं सामाजिक कार्य याबद्दलच्या अनेक आठवणी या मान्यवरांनी भावुक होत सांगितल्या.
ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम म्हणाले, “नाना असा अचानक गेला…बातमी ऐकल्यावर मला खरंच विश्वासच होत नव्हता. नानाबरोबरच्या आठवणी असंख्य आहेत. जवळपास ४० वर्षे आमची ओळख होती आणि हिंदी सिनेमात माझे पाय रोवले गेले ते नानामुळे. मला त्याने ओढून हिंदी सिनेमात आणलं होतं…तू कर, तू केलं पाहिजे असं त्यानेच मला समजावलं होतं. पहिलाच सिनेमा होता ‘यशवंत’. निर्मात्याने मला फोन केला, त्यात पोलिसांची भूमिका होती आणि मी तेव्हा त्या सिनेमासाठी तयार नव्हतो. निर्माता म्हणाला, तुमचे मित्र नाना पाटेकरांनीच तुमचं नाव सुचवलंय. माझा नकार ऐकून त्या निर्मात्याने नानाला फोन लावला, मला त्याच्या भाषेत त्याने समजावलं. शेवटी नाही-नाही म्हणताना मी तयार झालो. शूटिंग वगैरे झालं आणि मी पुन्हा नानाला भेटलो तेव्हा त्याने मला व्यवहाराबद्दल ( मानधन ) विचारलं. मी जेव्हा आकडा सांगितला तेव्हा तो खूप भडकला. अरे मला एकदा तरी विचारायचं होतं, त्यानंतर जे काय नानाने मला शिव्या घातल्या, तू मला का विचारलं नाहीस? मग त्याने स्वत: निर्मात्यांना बोलावून घेतलं.”
“निर्मात्यांना अजिबात काही विचारायचं नाही, बोलायचं नाही असं मी त्याला बजावून सांगितलं होतं. पण नाना काही ऐकला नाही. त्याने दोन तास त्या निर्मात्यांना उभं केलं, शाळेत जसे शिक्षक आपल्याला उभं करायचे ना अगदी तसंच…तो बिचारा निर्माताही उभा होता. काहीही बोलला नाही.”
पत्नीच्या आजारपणात नानाने सख्ख्या भावासारखी मदत केली होती याबद्दल सांगताना नाना म्हणाले, “नानावर माझं जीवापाड प्रेम होतं कारण, सख्ख्या भावाने जेवढं केलं नसेल तेवढं माझ्यासाठी नानाने केलं. तेव्हा ‘गुलाम ए मुस्तफा’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच माझ्या पत्नीला कॅन्सर झाला होता, मी त्याला सांगितलं नाना मी सिनेमा करत नाही. पण, तो ऐकला नाही. तो दिग्दर्शक वगैरे सर्वांशी बोलला. दुसऱ्यादिवशी पार्थव घोष आमचा जो दिग्दर्शक होता तो मला म्हणाला, दुपारी १२ वाजता ये आणि रात्री ८ वाजता मी तुला सोडेन. हे नानामुळे शक्य झालं. मला खूप सांभाळून घेतलं. सख्ख्या भावासारखी मला साथ दिली, असे त्याचे भरपूर किस्से आहेत. तो प्रचंड लव्हेबल होता. अचानक फोन यायचा काय करतोस? ताबडतोब शेतावर निघून ये! असा नानाचा स्वभाव होता.”
