Shivani Rangole & Mrinal Kulkarni : मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या सासू-सुनेची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघींनी काही प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम देखील केलेलं आहे. त्यामुळे शिवानी प्रेमाने आपल्या सासूबाईंना ‘ताई’ म्हणते. ‘विराजसचं लग्न झाल्यावर आमच्या घरी सून नव्हे, तर आमची मुलगी आली’ असं मृणाल कुलकर्णी कायम सांगत असतात. या दोघींचं नातं पाहून कोणीही म्हणेल सासू किंवा सून असावी तर अशी! या दोघी नुकत्याच त्यांच्या पहिल्या इंटरनॅशनल ट्रिपवर गेल्या आहेत. याची खास झलक शिवानीने व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. त्या दोघी नेमक्या कुठे गेल्या आहेत जाणून घेऊयात…
शिवानी रांगोळे व मृणाल कुलकर्णी या दोघी सध्या इंडोनेशिया फिरायला गेल्या आहेत. गेल्या काही वर्षांत इंडोनेशियातील बाली या बेटाला अनेक भारतीय पर्यटक भेट देत असल्याचं पाहायला मिळालं आहे. शिवानी रांगोळेने सुद्धा आपल्या सासूबाईंबरोबरच्या पहिल्या इंटरनॅशनल ट्रिपसाठी या सुंदर जागेची निवड केली आहे.
बाली येथील निसर्गरम्य वातावरण, बाजारपेठ, तिथे मिळणाऱ्या हटके युनिक वस्तू, ड्रेसेस याची झलक शिवानीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय. याशिवाय बालीला गेल्यावर तेथील उंच झोपाळ्यावर झोका घेऊन, सुंदर ड्रेस घालून फोटोशूट करणं हे पर्यटकांचं मुख्य आकर्षण असतं. शिवानीच्या व्हिडीओमध्ये या ‘बाली स्विंग’ची झलकही पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री हा व्हिडीओ शेअर करत म्हणते, “माझ्या लाडक्या सासूबाईंबरोबर पहिली ट्रिप” तिच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शिवानीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शेवटी मृणाल कुलकर्णींची झलक देखील पाहायला मिळतेय. “वॉव”, “What बाली with सासूबाई मस्तच” अशा प्रतिक्रिया अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर आल्या आहेत.
दरम्यान, शिवानी रांगोळेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर ती लवकरच ‘शंकर जयकिशन’ या नाटकात झळकणार आहे. यामध्ये तिच्यासह भरत जाधव व महेश मांजरेकर असे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. या नाटकाचं लेखन विराजस कुलकर्णीने केलं असून, या नाटकाचं दिग्दर्शन सुरज पारसनीसने केलं आहे. हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे.
