मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात आपली ओळख निर्माण करणारा प्रेक्षकांचा आवडता अभिनेता म्हणजेच श्रेयस तळपदे. आज त्याच्या लग्नाला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने श्रेयसने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

श्रेयसच्या पत्नीचं नाव आहे दीप्ती. या दोघांची पहिली भेट कॉलेज फेस्टिव्हलदरम्यान झाली होती. २००० साली श्रेयस एका लोकप्रिय मराठी कार्यक्रमात काम करत होता. त्यामुळे नामांकित महाविद्यालयाने त्याला एका फेस्टिव्हलसाठी निमंत्रित केलं होतं. त्या महाविद्यालयात दीप्ती जीएस (जनरल सेक्रेटरी) म्हणून काम पाहत होती. तिथेच दोघांची पहिली भेट झाली.

पहिल्या भेटीतच श्रेयस दीप्तीच्या प्रेमात पडला होता. तिला भेटण्याआधी तो इतर कोणत्याही मुलीबरोबर डेटवर गेला नव्हता. श्रेयसने दीप्तीला लग्नाची मागणी घातल्यावर तिने होकार द्यायला तब्बल ३ वर्षे लावली होती. पुढे, श्रेयस-दीप्तीने ३१ डिसेंबर २००४ मध्ये लग्न केलं. ‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो’, त्याप्रमाणे माझ्यामागे दीप्ती आहे.’ असं अभिनेता अनेक मुलाखतींमध्ये अभिमानाने सांगतो.

आज लग्नाला २१ वर्षे पूर्ण झाल्यावर श्रेयस तळपदेने दीप्तीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेता लिहितो, “२१ वर्षांपूर्वी मी तुला फक्त २१ मिनिटांसाठी भेटलो आणि त्याक्षणीच तुझ्या प्रेमात पडलो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा Dips. तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कधी कल्पनाच करू शकत नाही. तू खूप छान मैत्रीण आहेस, तेवढीच छान बायको आहेस…, आपल्या बाळाची काळजी घेणारी आई आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस…दीप्ती थँक्यू!”

श्रेयसने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. यासह प्रार्थना बेहेरे, सोनाली खरे, जितेंद्र जोशी, अभिजीत खांडकेकर, क्रांती रेडकर या कलाकारांनी सुद्धा कमेंट्स करत श्रेयस-दीप्तीला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, श्रेयस तळपदेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेता नुकताच ‘सिंगल सलमा’ या सिनेमात झळकला. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.