Shruti Marathe on why she made changes in Name: अभिनेत्री श्रुती मराठेने मराठीसह दाक्षिणात्य सिनेमांतही काम केले आहे. आता नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत सुरुवातीला ती जेव्हा दाक्षिणात्य सिनेमांत काम करत होती, त्यावेळी तिने तिच्या नावात बदल केला होता असा खुलासा केला आहे.
दाक्षिणात्य सिनेमात काम करताना श्रुती मराठेने केलेला नावात बदल
श्रुतीने ‘अमुक तमूक या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले की, श्रुती प्रकाश कोण आहे? यावर ती म्हणाली, “श्रुती प्रकाश मीच आहे. मी पहिला तमिळ चित्रपट २००९ मध्ये केला होता, तेव्हा साऊथ आणि नॉर्थ इंडस्ट्री वेगवेगळे होते. आता ते सगळं ओटीटीमुळे एकत्र झालं आहे, पण तेव्हा तसं नव्हतं.”

पुढे ती म्हणाली, “मी जेव्हा पहिल्या तमिळ सिनेमात केलं, तेव्हा त्यांना असं वाटलं की मराठे हे आडनाव खूप मराठी आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की, तू दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात करत आहेस तर तुझं नाव थोडं दाक्षिणात्य वाटेल असं करूयात. मी हो म्हणाले, कारण मी नवीन होते. मला काही कळत नव्हतं. मला हे पटत नाही सांगण्याइतपत माझी जागा निर्माण झाली नव्हती, तर मी त्यांना ठीक आहे असं म्हणाले.”

नावात काय बदल केला हे सांगत श्रुती म्हणाली, “माझ्या वडिलांचं नाव प्रकाश आहे. मग माझं नाव श्रुती प्रकाश असं करण्यात आलं आणि तीन-चार चित्रपट मी याच नावाने केले. त्यानंतर मी साऊथ सिनेमांतून ब्रेक घेतला. मी मराठीत परत आले. ‘राधा ही बावरी’ मालिकेत काम केलं. पण, जेव्हा ‘देवरा’ या दाक्षिणात्य सिनेमात काम केलं, तेव्हा मी श्रुती मराठे हे नाव लावलं आणि आतासुद्धा दोन तेलुगू चित्रपट करत आहे, त्यामध्ये मी श्रुती मराठे नाव लावत आहे. आता सांगितलं की मराठेच वापरत जा.”

दरम्यान, श्रुतीने याच मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या. देवरा सिनेमात कसे कास्टिंग झाले, याबद्दलही तिने खुलासा केला आहे.
