Sanskruti Balgude Shruti Marathe Viral Video : लवकरच गणेशोत्सव सुरू होणार असून, त्यासाठी पुण्यामध्ये ढोल-ताशा पथकांची तयारी सुरू झाली आहे. कलाकारांसाठी खास पुण्यामध्ये ‘कलावंत’ ढोल-ताशा पथक आहे. गणेशोत्सव जवळ आल्याने ‘कलावंत’ ढोल पथकाची तयारी सुरू झाली असून, त्यामध्ये अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. यामधील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठे व संस्कृती बालगुडे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
श्रुती मराठे व संस्कृती बालगुडेचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये श्रुती व संस्कृती दोघीही ढोल-ताशा वादन सरावाच्या जागी असून, संस्कृतीने कंबरेला ढोल बांधला आहे. यावेळी ती श्रुतीकडे बघत असून, श्रुतीचे मात्र तिच्याकडे लक्ष नसल्याचे दिसून येते. त्यानंतर संस्कृतीने श्रुतीला ‘श्रु..’ असा आवाज दिल्यानंतर ती श्रुतीला ‘थँक्यू’ म्हणते. त्यानंतर दोघीही एकमेकींकडे बघून हसतात. श्रुती व संस्कृतीचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण पहिल्यांदा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना श्रुती मराठे ही संस्कृतीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा भास होत आहे; पण तसे नसून यामागचे खरे कारण वेगळे आहे.
सुमीत दगडे सिनेमॅटिक्स या इन्स्टाग्राम पेजवरून व्हिडीओ शेअर झाल्यानंतर अभिनेत्री श्रुती मराठेने स्वतः यावर कमेंट करीत नेमके काय घडले होते ते सांगितले आहे. व्हिडीओमध्ये श्रुतीने संस्कृतीकडे दुर्लक्ष केल्याचा गैरसमज निर्माण होऊ शकतो; पण प्रत्यक्षात तसे नसल्याचे श्रुतीने सांगितले आहे. पोस्टवर कमेंट लिहीत श्रुती म्हणाली, “फक्त संदर्भासाठी सांगते, मागच्या वर्षापासून मी संस्कृतीच्या मागे लागले होते की, एकदा तरी तू सरावासाठी ये, तुला हे नक्की आवडेल. पण, मागच्या वर्षी तिला काही जमलं नाही. त्यामुळे या वर्षी मी तिच्या मागे लागून तिला घेऊन आले आणि म्हणून ती श्रु…धन्यवाद, असं म्हणाली.”
मी जवळच्या माणसांकडे कधीच दुर्लक्ष करत नाही – श्रुती
पुढे तिने लिहिले, “मी तिच्याकडे दुर्लक्ष करीत नाही. मला माझा ढोल सापडत नव्हता आणि मी त्यामुळे टेन्शनमध्ये आले होते. कारण- बाकी सगळे वादनासाठी ढोल बांधून तयार होते. मी लोकांना इग्नोर करीत नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत नाही; खासकरून माझ्या जवळच्या आणि आवडत्या व्यक्तींकडे तर कधीच दुर्लक्ष करत नाही,” अशा आशयाची कमेंट करीत श्रुतीने घडलेली खरी परिस्थिती मांडली आहे.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांची श्रुती मराठेवर नाराजी
सोशल मीडियावर श्रुती मराठे व संस्कृती बालगुडेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी श्रुतीला ती दुर्लक्ष करीत असल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली. एका नेटकऱ्याने लिहिले, ‘संस्कृती श्रुतीला बोलावतीये तर, मग श्रुती एवढा का भाव खातीये?’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, ‘श्रुतीने बघून न बघितल्यासारखं केलं,’ आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं, “कितीही व्यासपीठ मोठे मिळाले तरी जमिनीवर पाय ठेवणाऱ्या व्यक्तीवरील संस्कार सर्वांत मोठे असतात म्हणूनच तिचं नाव संस्कृती ठेवलं. नावाप्रमाणे ती स्वतःला जपते.” श्रुती मराठेबाबत नेटकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाल्यानंतर तिने कमेंट करीत नेमके काय घडले होते ते सांगितलं आहे.
पुण्यात कलावंत ढोल-पथकाचा सराव सुरू
‘कलावंत’ ढोल पथकामध्ये मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारही सहभागी होत असतात. गणरायाच्या आगमनावेळी आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये ते वाद्य वादन करून गणरायाच्या चरणी श्रद्धा अर्पण करीत असतात. त्यामध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव, आस्ताद काळे, सौरभ गोखले, अभिनेत्री श्रुती मराठे, अनुजा साठे, तेजस्विनी पंडित असे अनेक कलाकार ढोल वादन करतात. त्याचबरोबर दरवर्षीने नव्याने कलाकार सहभागी होत असतात. सध्या सोशल मीडियावर संस्कृती बालगुडे व श्रुती मराठे यांचा वादन सरावातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
