घर म्हटलं की प्रेम, अपेक्षा, स्वप्नं, मतभेद आणि एकमेकांची काळजी हे सगळं आलंच. मुलांची स्वप्नं आणि पालकांच्या अपेक्षा यांच्यातली तारेवरची कसरत अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. यावर आधारित ‘शुभं करोति’ हे नवीन मराठी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नाटकातलं घर नाही… घराघरातलं नाटक…’ अशी उत्सुकता वाढवणारी ओळख घेऊन येणारं हे नाटक १ ऑक्टोबरपासून रंगभूमीवर दाखल होत आहे.

‘शुभं करोति’ची कथा एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाभोवती फिरणारी आहे. स्वतःच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये वेगळीपेक्षा स्वप्न पाहणारा तरुण मुलगा, त्याचा प्रवास आणि यादरम्यान पालकांच्या मनात निर्माण होणारे प्रश्न तसेच, अपयशाच्या टप्प्यावर कुटुंबाची मिळणारी साथ, या सगळ्याची भावनिक गुंफण या नाटकात पाहायला मिळणार आहे.

या नाटकात अभिनय बेर्डे, अपूर्वा गोरे, सीमा देशमुख आणि हृषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १ ऑक्टोबरपासून घराघरांत घडणारी ही गोष्ट रंगमंचावर दाखल होत आहे. आपल्या कुटुंबातील नात्यांची, स्वप्नांची आणि अपेक्षांची काहीशी ओळखीची झलक दाखवणारं ‘शुभं करोति’ प्रेक्षकांना हसवेल, भावेल आणि आपल्या घराकडे नव्या नजरेने पाहायलाही भाग पाडेल.

या नाटकाचं लेखन वैभव जोशी यांनी केलं असून, दिग्दर्शन भाग्येश रानडे यांचं आहे. श्रीरंग खापर्डे, सिद्धार्थ गोखले, नितीन प्रकाश वैद्य आणि राहुल शरद अवस्थी हे नाटकाचे निर्माते आहेत. परंपरा आणि आजची पिढी यांचा एक सुंदर संवादही या नाटकातून घडताना दिसणार आहे.

दिग्दर्शक भाग्येश रानडे म्हणतात, “शुभं करोति’ ही एका घराची गोष्ट आहे आणि त्याच वेळी ती अनेक घरांची गोष्टही आहे. आज मुलांच्या स्वप्नांचा आणि पालकांच्या अपेक्षांचा मेळ घालताना अनेक कुटुंबांमध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. अपयश आलं की आपण स्वतःकडे आणि आपल्या माणसांकडे कसं पाहातो, हा या नाटकाचा महत्त्वाचा भाग आहे. श्लोक आणि संतसाहित्यातले विचार या नाटकात आम्ही प्रेक्षकांना कोणताही उपदेश न करता कथेत अगदी सहजपणे गुंफले आहेत. प्रेक्षकांनी हे नाटक पाहताना ‘ही तर आपल्या घरातलीच गोष्ट आहे’ असं कुठेतरी मनापासून जाणवावं, अशी आमची इच्छा आहे.’’

लेखक वैभव जोशी म्हणतात, “शुभं करोति’ लिहिताना मला आजच्या कुटुंबांमध्ये बदलत जाणारी नाती आणि त्या नात्यांमागच्या भावना मांडायच्या होत्या. मुलांना स्वतःचं आयुष्य घडवायचं असतं तर पालकांना त्यांच्या भविष्याची काळजी असते. या दोन बाजूंमधला संवाद, त्यातून निर्माण होणारे प्रसंग आणि शेवटी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न हा या नाटकाचा गाभा आहे. आजच्या काळातही आपल्या संस्कारांमधले विचार आपल्याला कसे जोडून ठेवतात, हे कथेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.’’