Shubhankar Tawde New Car : वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असतो. आपल्या वाढदिवसानिमित्त छान काहीतरी करायचं असं स्वप्न प्रत्येकाचं असतं आणि आज एका मराठी अभिनेत्याचं असंच एक स्वप्न पूर्णत्वास आलं आहे. मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे यांचा लेक शुभंकर तावडेने नुकताच त्याचा ३० वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण मराठी कलाविश्वातून शुभंकरवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
‘फ्रेशर्स’, ‘कागर’, ‘कन्नी’ यांसारख्या नवनवीन प्रोजेक्ट्समधून शुभंकरने ( Shubhankar Tawde ) कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक अपडेट तो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. आपला ३० वा वाढदिवस मित्रमंडळींसह जल्लोषात साजरा केल्यावर शुभंकरने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नवीन नाटक, नवीन गाडी अन्…
वाढदिवसाच्या शुभदिनी शुभंकरच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालं आहे. याचे खास फोटो अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिनेत्याने त्याच्या नव्याकोऱ्या गाडीची पहिली झलक आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. शुभंकरने आपल्या नव्या गाडीचं नामकरण देखील आहे. तावडे कुटुंबीयांनी या गाडीचं नाव ‘लक्ष्मी’ ठेवलंय. पण, शुभंकर सिक्रेटली या गाडीला ‘फनकार’ म्हणतो असं त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
शुभंकर ( Shubhankar Tawde ) लिहितो, “मी ३० वर्षांचा झालो…नवीन गाडी घेतली. तिचं नाव लक्ष्मी ठेवलं. मी मात्र, अजूनही या गाडीला गुपचूप ‘फनकार’ किंवा Fun-Car म्हणतो. याशिवाय माझ्या नव्या नाटकाची म्हणजेच ‘विषामृत’ची घोषणा करण्यात आली आहे. मला तुम्हा सर्वांकडून भरभरून शुभेच्छा आणि प्रेम मिळालं…यानंतर वाढदिवसाची पार्टी सुद्धा केली. प्रचंड आनंद मिळाला.”
हेही वाचा : Video : अनाथ व निराधार वृद्धांसाठी मदतीचा हात…; ‘ठरलं तर मग’ जुई गडकरीच्या ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक
दरम्यान, शुभंकर तावडेच्या ( Shubhankar Tawde ) पोस्टवर ईशा केसकर, प्रियदर्शिनी इंदलकर, आरती मोरे, सोहम बांदेकर, अजिंक्य राऊत यांनी कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘विषामृत’ या नव्या नाटकाबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये प्रियदर्शिनी इंदलकर आणि शुभंकर तावडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.