Kolkata Doctor Rape and Murder Case : कोलकाता येथील आर. जी. आर वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणातील तरुणीला न्याय मिळण्याकरिता नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. बॉलीवूड कलाकारांसह मराठी कलाकार देखील याप्रकरणावर आपल्या तीव्र भावना व्यक्त करत आहेत. आज स्वातंत्र्य दिनी काही मराठी कलाकारांनी याविषयी भाष्य केलं. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने ( Siddharth Chandekar ) याप्रकरणावर आपलं परखड मत मांडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारतमातेची माफी मागून त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने ( Siddharth Chandekar ) व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, "सॉरी भारत ‘माते’! तुला तुझ्याच घरात स्वातंत्र्य नाही! हा स्वातंत्र्य दिन तुझ्यासाठी आनंदी नाही. क्षमा." या व्हिडीओत सगळ्यांना विचार करायला भाग पडणारा मुद्दा सिद्धार्थने मांडला आहे. अभिनेता म्हणाला, "मला वाटतंय मुलगी शिकली प्रगती झाली हे आपण आता बोलायला नको. मुलगी शिकतेय. तिला शिकू दिलं जात नाहीये. ती प्रगती करण्याची धडपड करतेय. तिची प्रगती होऊ दिली जात नाहीये." हेही वाचा - Bigg Boss Marathi : सूरज चव्हाणला प्रेमात मिळालेला धोका, निक्की तांबोळीला सांगत म्हणाला, “माझ्याबरोबर चांगली असायची पण…” विचार करू या - सिद्धार्थ चांदेकर पुढे सिद्धार्थ म्हणाला, "आपल्या घरातली मुलगी संध्याकाळी सातच्या आत घरात येते की नाही हे बघण्यापेक्षा आपल्या घरातला मुलगा संध्याकाळी सातनंतर कुठे जातो? काय करतो? काय संगत आहे त्याची? कोणाशी बोलतोय? काय विचार आहेत त्याचे? हे बघणं जास्त गरजेचं आहे. खरंच या देशातला मुलगा शिकला, तो सुसंस्कृत झाला, स्त्रीयांचा आदर करायला शिकला. तर या देशाची प्रगती झाली. या देशातल्या मुलाचे विचार बदलले. त्याचा अक्षम्य चुका पाठिशी घालणाऱ्या आई-वडिलांचे, मित्रांचे, नातेवाईकांचे विचार बदलले तरच ती भारतमाता स्वतंत्र झाली असं आपण अभिमानाने म्हणू शकतो. नाहीतर स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनंतर सुद्धा ती दहशत इथेच जगतेय. विचार करू या." हेही वाचा – “देशप्रेम हे वांझोटं…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने मार्मिक पोस्ट लिहित स्वातंत्र्य दिनाच्या दिल्या शुभेच्छा, म्हणाले, “लाल किल्यावरून भाषणं देऊन…. “ सिद्धार्थ चांदेकरच्या ( Siddharth Chandekar ) या मतावर काही कलाकारांसह चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, "एका मुलीच्या जागी राहून मत दिलं आहे तुम्ही…फार कमी लोक असतात ज्यांना हे समजत, पण काही बोलतं नाहीत आणि आज तुम्ही समजून ते इतरांना समजावलात खूप खूप आभारी आहे. स्वातंत्र्य दिनाचा खूप खूप शुभेच्छा." दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, "अगदी खरे बोललात. पण कधी कधी वाहिन्यांनी आणि चित्रपट बनवणाऱ्यांनी पण बंधन ठेवायला पाहिजे की, काय दाखवावं आणि काय दाखवू नये याबाबत." तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, "असे विचार सर्व पुरुषांचे होतील तेव्हा खरं देशाला स्वातंत्र्य मिळेल."