Siddharth Chandekar Fraud Call : ससध्याचं युग हे डिजिटल युग आहे. या डिजिटल युगात आता सगळेच जण सोशल मीडियाचा वापर करतायत. त्यामुळे अनेक गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या आहेत हे नक्की; पण याचे धोकेसुद्धा तितकेच वाढले आहेत. सोशल मीडिया फ्रॉड, फेक कॉल, डिजिटल अरेस्ट यांसारख्या अनेक धक्कादायक गोष्टी आपण ऐकल्यात.

फक्त सर्वसामान्यच नाही तर अनेक सेलिब्रिटीही या डिजिटल फसवणुकीच्या विळख्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वीचं चिन्मय मांडलेकरबरोबर एक फ्रॉड कॉलचा प्रसंग घडला होता. त्याबद्दल चिन्मयनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत माहिती दिली होती. तसेच याबद्दल त्यानं जागरूक आणि सतर्क राहण्याचं आवाहनसुद्धा केलं होतं. अशातच आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबरही असाच प्रसंग घडला आहे आणि याचा व्हिडीओ अभिनेत्याने शेअर केला आहे.

सिद्धार्थ चांदेकरला आला फ्रॉड कॉल

सिद्धार्थ चांदेकर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ, तसेच पत्नी मितालीबरोबरचे मजेशीर व्हिडीओसुद्धा शेअर करीत असतो. अशातच आता त्यानं महानगर गॅस कंपनीकडून आलेल्या फ्रॉड कॉलचा व्हिडीओ शेअर केला आहे. सिद्धार्थबरोबर नेमकं काय घडलंय, चला जाणून घेऊ…

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महानगर गॅस कंपनीच्या नावे आलेल्या कॉलमध्ये समोरची व्यक्ती सिद्धार्थशी हिंदी बोलत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यावर सिद्धार्थ त्याला मराठीत बोलण्यास सांगतो. मग समोरची व्यक्ती मराठी येत नसल्याचं म्हणतो. त्यावर सिद्धार्थही ‘महानगर’चे कर्मचारी असून, मराठी येत नाही, असं म्हणत त्याची फिरकी घेतो. पुढे कॉलवरून सिद्धार्थला मेसेज करण्यासाठी सांगितलं जातं. त्यावर सिद्धार्थ त्या व्यक्तीला एक अट घालतो.

सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला व्हिडीओ

सिद्धार्थ त्याला म्हणतो, “तुम्ही मराठीत एक ओळ म्हटलीत, तर मी तुम्हाला मेसेज करेन.” त्यावर सिद्धार्थ त्याला ‘स्वर्गात आकाशगंगा…’ या गाण्याच्या ओळी म्हणायला सांगतो. त्यावर कॉलवरील व्यक्ती नकार देते; पण सिद्धार्थ त्याला या ओळी म्हणल्याशिवाय मेसेज करणार नाही, असं म्हणतो. तसंच तुम्ही हे गीत गायलंत, तर तुम्ही महानगर गॅस कंपनीमधून बोलताय हे नक्की होईल, हेही सांगतो. त्यामुळे ती व्यक्ती ‘स्वर्गात आकाशगंगा…’ गाण्याच्या ओळी म्हणण्यास तयार होते. पुढे सिद्धार्थच्या मागोमाग ती व्यक्ती त्याच्या तोडक्या मोडक्या मराठीत ‘स्वर्गात आकाशगंगा, गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या शंभर, झाला आनंद आली बहार…’ हे गीत म्हणते. पुढे सिद्धार्थ कॉल कट करतो आणि हसू लागतो. दरम्यान, घडलेला संपूर्ण प्रकार सिद्धार्थनं त्याच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आहे आणि हा व्हिडीओ त्यानं शेअर केला आहे.

या मजेशीर व्हिडीओसह सिद्धार्थनं चाहत्यांना एक आवाहनसुद्धा केलं आहे. तो म्हणतो, “कुठलीही सरकारी संस्था तुम्हाला whatsapp वर चॅट करायला सांगत नाही. खूप लोक याला बळी पडत आहेत. सर्वांनी काळजी घ्या आणि त्यांची मजा घ्या.”