Siddharth Chandekar Poem : जगभरात दरवर्षी १९ नोव्हेंबरला ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिन’ साजरा केला जातो. समाज आणि कुटुंबातील पुरुषांचं स्थान, महत्व आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने पुरुषांच्या समस्या, आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. याच पार्श्वभूमीवर लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर खास कविता शेअर केली आहे.

सिद्धार्थ चांदेकरने ‘भावा… हे तुझ्यासाठी!’ या कवितेच्या माध्यमातून पुरुषांच्या भावना, जबाबदाऱ्या यावर प्रकाश टाकला आहे. त्याची कविता ऐकताच नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सिद्धार्थ चांदेकरची कविता…

भावा… तुझी ओझी उचलताना कधी तुझा खांदा दुखावला आणि वाटलं भिरकावून द्यावं सगळं
तरीही चालेल…
मनात साठवलेलं सगळं अलमारीत भरता-भरता एखादा हुंदका खाली पडला
तरीही चालेल
केवढी धाप लागली, घोटभर पाणी तरी पी…उसन भरेल आता, जरा ती पाठ टेकव की
अरे होणारे सर्व हवं तसं
जरा श्वास घे बरं
उरलेली गणितं उद्या कर
आता जरा डोळे मीट बरं
मी आहे हे दाखवून द्यायला गावभर फेऱ्या मारणार
आणि मी नसलो तर यांचं काय होईल…हा विचार रात्रभर करणार
घेतोसच आहे की सगळ्यांची काळजी… थोडं स्वत:कडे लक्ष दे
सगळ्यांचे हट्ट पुरवून झाले असतील तर स्वत:साठीही काहीतरी घे
उशीमध्ये तोंड खुपसून जोरात ओरडावंसं वाटलं
तरीही चालेल
तिच्या कुशीत शिरुन धाय मोकलून रडावंसं वाटलं
तरीही चालेल
सकाळी फक्त तुझ्या पायातली ती ताकद परत आण
अजून खूप लांब जायचंय तुला
तू महत्त्वाचा आहेस आणि तू हे करू शकतोस
हे त्या आरशातल्या चेहऱ्याला सांगायचंय तुला
Happy Men’s Day

सिद्धार्थ चांदेकरने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “किती सुंदर”, “अंगावर काटा आला”, “सिद्धार्थ किती छान”, “वाह सुंदर” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच तो ‘मिसेस देशपांडे’ या सीरिजमध्ये झळकणार आहे. यामध्ये अभिनेता ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.