मनोरंजनसृष्टीतील कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांचे चित्रपट, कधी त्यांची वक्तव्ये, तर कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट यांमुळे हे कलाकार चर्चेत असतात. आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar)ने त्याच्या पत्नी मिताली (Mitali Mayekar)साठी एक पोस्ट शेअर केली आहे.
सिद्धार्थ चांदेकरची मितालीसाठी खास पोस्ट
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर मितालीच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मितालीने सिद्धार्थचा हात धरला असून, ती गोल गिरक्या घेत आहे. महत्त्वाचे म्हणजे ती जेव्हा प्रत्येक वेळी गोल फिरते त्यावेळी ती वेगळ्या ठिकाणी दिसत आहे. या पोस्टला सिद्धार्थने, “असाच हात घट्ट पकडून ठेव! अख्खं जग बघू एकत्र! हॅपी बर्थडे माझी भिंगरी”, अशी कॅप्शन देत मितालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सिद्धार्थ आणि मिताली हे कलाकार असून, सोशल मीडियावर हे जोडपे सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांबरोबर जोडले जातात.
मितालीने वयाच्या १३ व्या वर्षी दिवंगत अभिनेत इरफान खान यांच्या ‘बिल्लू’ चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात तिने इरफान खानच्या मुलीची भूमिका साकारली होती. ‘असंभव’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका’ या मालिकांतून तिने कामे केली आहेत. २०१६ मध्ये तिने फ्रेशर्स या मालिकेत सायलीची भूमिका केली होती. ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसली होती.
याबरोबरच, ती ‘उर्फी’, ‘यारी दोस्ती’, ‘आम्ही बेफिकर’, ‘हॅशटॅग प्रेम’ या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिकांत दिसली होती.
सिद्धार्थ चांदेकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने वयाच्या १९ व्या वर्षी झेंडा या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्याने अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’, ‘संशय कल्लोळ’, ‘बालगंधर्व’, ‘हमने जीना सीख लिया’, ‘ती आणि ती’, ‘जय जय महाराष्ट्र’, ‘बेफाम’, ‘सतरंगी रे’, ‘दुसरी गोष्ट’, ‘रणांगण’, ‘पिंडदान’, ‘मिस यू मिस्टर’, ‘वजनदार’ , ‘क्लासमेट्स’, ‘बस स्टॉप’, ‘गुलाबजाम’, ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ अशा अनेक चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीने २४ जानेवारी २०२१ ला लग्नगाठ बांधली होती.