Siddharth Chandekar : मराठी मालिका, सिनेमा, वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये सिद्धार्थ चांदेकरने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आजवर सिद्धार्थने ‘गुलाबजाम’, ‘वजनदार’, ‘लग्न पहावे करून’, ‘क्लासमेट्स’ अशा बऱ्याच गाजलेल्या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनेता सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असतो. सिद्धार्थने नुकताच इन्स्टाग्रामवर एक खास फोटो शेअर करत त्याच्या जुन्या चित्रपटाची आठवण चाहत्यांना सांगितली आहे.

सिद्धार्थ चांदेकरने १५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘बालगंधर्व’ चित्रपटामध्ये स्त्री पात्र साकारलं होतं. याची खास आठवण त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. सुंदर नऊवारी साडी, कपाळावर टिकली, गळ्यात हार असा लूक सिद्धार्थने या स्त्री पात्रासाठी केला होता.

सिद्धार्थ चांदेकर भावना व्यक्त करत लिहितो, “१५ वर्षांपूर्वी या अजरामर सिनेमात काम करण्याची मला संधी मिळाली. बालगंधर्व…भूमिका छोटी पण आठवण आभाळाएवढी… मराठी नाट्य संगीताशी माझी पहिली ओळख इथेच झाली. आज त्या सिनेमाला १५ वर्षे झाली. पण, जणू परवाचीच आठवण!”

सिद्धार्थने शेअर केलेला हा सुंदर फोटो पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हेमंत ढोमे या फोटोवर कमेंट करत म्हणतो, “काय म्हणतेस सीमा? कशी आहेस? वरणफळं कधी खाऊ घालशील?” हेमंतसह गायत्री दातार, क्षिती जोग, सिद्धांत सरफरे अशा सगळ्याच कलाकारांनी त्याचा लूक पाहून कौतुक केलं आहे.

Siddharth Chandekar
सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट, हेमंत ढोमेने केली खास कमेंट ( Siddharth Chandekar )

तर, अन्य नेटकऱ्यांनी “सोज्वळ रुप”, “किती सुंदर फोटो”, “किती गोड”, “आमच्या चांदेकर वहिनी”, “या सिनेमाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे”, “वॉव आमचा गोड सिद्धू”, “सिद्धार्थ मस्त फोटो” अशा प्रतिक्रिया या फोटोवर दिल्या आहेत.

दरम्यान, सिद्धार्थ चांदेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अलीकडेच तो ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या सिनेमात झळकला. याशिवाय सिद्धार्थ ‘झिम्मा ३’ मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. ‘झिम्मा ३’ पुढच्यावर्षी १ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.