Siddharth Chandekar : मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी कायम लहानच असतात. आईचं स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचं देखील आपल्या आईशी खूपच खास बॉण्डिंग आहे. बर्थडे असो किंवा मातृदिन सिद्धार्थ नेहमीच आईसाठी खास पोस्ट शेअर करत असतो. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही पोस्ट नेमकी काय आहे पाहुयात…

सिद्धार्थ सध्या ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. कोणत्याही सिनेमाचं किंवा प्रोजेक्टचं प्रमोशन करताना भरपूर धावपळ होते. एकाच दिवशी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. सिद्धार्थ सुद्धा अलीकडे प्रचंड व्यग्र आहे. यादरम्यान, त्याच्या आईने त्याला खास सरप्राइज दिलं आहे.

सिद्धार्थ चांदेकरची आई पुण्यात असते. यावेळी लाडक्या लेकाला फक्त ५ मिनिटं भेटण्यासाठी त्या पोहोचल्या होत्या. सिद्धार्थ आईचा व्हिडीओ शेअर करत लिहितो, “शाळेच्या स्नेहसंमेलन सोहळ्यात आपण स्टेजवर नाचत असताना खाली प्रेक्षकांमध्ये आई दिसली की कसा आनंद व्हायचा! तसा अजूनही होतो! काल अगदी ५ मिनिटांसाठी आई धावत-धावत मला भेटायला आली…”

Award Banner

यावेळी सिद्धार्थच्या आईने त्याच्यासाठी खास गुळतूप पोळीचे लाडू बनवून आणले होते. आईने बनवून दिलेले हे लाडू पाहून सिद्धार्थचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. शाळेत जाताना आई प्रेमाने डबा बनवून द्यायची तो क्षण पुन्हा आठवला असं सिद्धार्थने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

सिद्धार्थ चांदेकरच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, त्याची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा सिनेमा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. यामध्ये सिद्धार्थसह क्षिती जोग, अमेय वाघ, प्राजक्ता कोळी, कादंबरी नाईक, पुष्कराज, हरीश दुधाडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन हेमंत ढोमेने केलं आहे.