Siddharth Jadhav & Rohit Shetty : अभिनेता सिद्धार्थ जाधवने मराठीसह हिंदी कलाविश्वात सुद्धा उल्लेखनीय काम केलेलं आहे. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींचा सिद्धार्थ खूप जवळचा मित्र आहे. नुकत्याच भारती सिंहच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने रोहित शेट्टीबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

सिद्धार्थने सुरुवातीला करिअरमध्ये आलेल्या ब्रेकविषयी भाष्य केलं. तो म्हणाला, “२०१३ ते २०१७ या चार वर्षांत मला फारसं काम नव्हतं. त्याकाळात मला महेश सर, रोहित शेट्टी सरांनी खूप साथ दिली. २०१७ नंतर मी ‘फास्टर फेणे’ चित्रपट केला मला माझ्या कामासाठी पुरस्कार मिळाला…कामाचं कौतुक झालं. मी हळुहळू ट्रॅकवर येऊ लागलो. त्यानंतर मग ‘येरे येरे पैसा’ या संजय जाधव सरांच्या चित्रपटात काम केलं. हा सिनेमा खूप चांगला चालला. या सिनेमाच्या म्युझिक लॉन्चला रोहित शेट्टी सर आले होते. ते खरंच ‘मॅन विथ गोल्डन हार्ट’ आहेत. त्यांनी माझी लगेच विचारपूस वगैरे केली. दुसऱ्या दिवशी मला ‘सिंबा’ चित्रपटासाठी फोन केला होता. त्यांनी त्यांच्या सगळ्या चित्रपटांसाठी हक्काने मला फोन केला, एक वेगळाच आपलेपणा त्यांनी दाखवला. यावरून एक किस्सा मला आठवला तो सांगतो.”

सिद्धार्थ, दिग्दर्शक रोहित शेट्टीचा किस्सा सांगत म्हणाला, “रोहित शेट्टी सरांचं जिथे ऑफिस आहे, त्याच इमारतीत मी एका डबिंगसाठी गेलो होतो. माझं डबिंगचं काम पूर्ण झाल्यावर मी त्यांना पूर्व कल्पना न देता त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसमध्ये जाऊन मी विचारलं, “रोहित सर आहेत का?” आणि आतमध्ये मी जाऊन बसलो. त्यांची टीम माझ्याकडे आश्चर्याने बघत होती कारण, रोहित सरांना भेटण्यासाठी त्यांची आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तिथल्या एका मॅडमने मी आल्याची माहिती रोहित सरांना दिली. सर तेव्हा एका मीटिंगमध्ये होते.”

“सर आले, ते मला भेटले… त्यांनी मला असं अजिबात जाणवू दिलं नाही की, तू अचानक का आला आहेस वगैरे असं काहीच त्यांनी दाखवलं नाही. त्यांनी मला केबिनमध्ये नेलं. आम्ही दोघंही बसलो, गप्पा मारल्या. माझं त्यांच्याकडे त्या दिवशी काहीच काम नव्हतं. पण, त्यांच्याकडे एवढी आपलेपणाची भावना आहे की, मी स्वत:हून त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मी त्यांच्याबद्दल नेहमी हेच सांगतो की, ‘मॅन विथ गोल्डन हार्ट…’ ‘गोलमाल’पासून मी त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकलो. सगळ्या गोष्टी बदलल्या पण, ते बदलले नाहीत. त्यांनी भरपूर यश मिळवलं पण, सरांनी त्यांच्यातला साधेपणा कायम जपलेला आहे.” असं सिद्धार्थ जाधवने सांगितलं.

अभिनेता पुढे म्हणाला, “सरांबद्दल मला नेहमीच आदरयुक्त भीती असते. रणवीर सिंह सर, रोहित शेट्टी सर यांच्याबरोबर काम करताना नेहमीच एक वेगळी एनर्जी मिळते. मी सरांबरोबर ‘गोलमाल’, ‘गोलमाल २’, ‘गोलमाल ३’, ‘ऑल द बेस्ट’, ‘सिंघम’, ‘सर्कस’, ‘सिंबा’ या सगळ्या सिनेमांसाठी एकत्र काम केलं आहे. त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं ही खरंच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.”