scorecardresearch

Video : सिद्धार्थ जाधवकडून अशोक सराफ यांना अनोखी मानवंदना; केलं असं काही की सगळ्यांच्या डोळ्यात आले आनंदाश्रू

सिद्धार्थ जाधव भावूक होऊन मंचावरुन खाली उतरला अन्…

ashok saraf lifetime achievement
फोटो : सोशल मीडिया

यंदाचा ‘झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा’ हा खूप अविस्मरणीय ठरणार आहे कारण अनेक दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स पाहता येणार आहेत. ‘पुष्पा’फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना या सोहळ्यात खास हजेरी लावून एक धमाकेदार नृत्य सादर करणार आहे. याबरोबरच मराठीतली सदाबहार जोडी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर बऱ्याच काळानंतर एकत्र धमाकेदार सादरीकरण करणार आहेत.

या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘जीवनगौरव पुरस्कार’, यावर्षी या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले ते म्हणजे आपले लाडके मामा म्हणजेच अभिनय सम्राट ‘अशोक सराफ’. पन्नासच्या वर हिंदी सिनेमे, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमे, पंधरा टीव्ही मालिका, पंचवीस नाटकं आणि पुरस्काराचं अर्धशतक एवढा प्रचंड प्रवास आहे मामांचा. जो आजही तेवढ्याच ताकदीने सुरू आहे.

आणखी वाचा : थकलेला चेहेरा, डोळ्यात दाटलेलं पाणी; मृणाल ठाकूरने ‘तो’ फोटो शेअर करत मांडली तिची व्यथा

या सोहळ्यात अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या नृत्याविष्काराने अशोक मामांचा जीवन प्रवास उलगडत अनोखी मानवंदना दिली आहे. नुकताच या खास स्पेशल क्षणाचा एक टीझर झी मराठीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नृत्य सादर करून झाल्यावर सिद्धार्थ जाधवने जे केलं ते पाहून तिथल्या कित्येकांच्या डोळ्यात पाणी आलं.

आपला परफॉर्मन्स सादर करून झाल्यावर सिद्धार्थ जाधव भावूक होऊन मंचावरुन खाली उतरला. त्याने हातातील फुलांचा हार अशोक सराफ यांना घातला अन् तिथेच त्याने अशोक सराफ यांना साष्टांग दंडवतदेखील घातला. हे पाहताच अशोक मामाही खूप भावूक झाले, त्यांनीदेखील हात जोडून सिद्धार्थने दिलेली मानवंदना स्वीकारली. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील कित्येक मोठमोठे कलाकार उपस्थित होते. सिद्धार्थची ही कृती पाहून अलका कुबल, महेश कोठारे, जयवंत वाडकर, सचिन पिळगांवर यांच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले.

नंतर अशोक सराफ यांचा हात धरून सचिन पिळगांवकर हे त्यांना मंचावर घेऊन गेले आणि तिथे येताच अशोक सराफ यांनी मायबाप रसिक प्रेक्षकांचे हात जोडून आभार मानले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना रविवार २६ मार्च संध्या. ७ वा. झी मराठीवर पाहता येणार.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 09:22 IST

संबंधित बातम्या