सिद्धार्थ जाधवने त्याच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. बॉलीवूडमधल्या अनेक सुपरस्टार कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी सिद्धार्थला मिळाली आहे. सलमानच्या २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राधे’ चित्रपटातही सिद्धार्थने एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. सिद्धार्थची सलमान खानबरोबर पहिली भेट कुठे झाली? मराठमोळ्या सिद्धूला सलमानच्या सिनेमात झळकण्याची संधी कशी मिळाली याबाबत त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
सिद्धार्थ सुरुवातीपासून सलमान खानचा खूप मोठा फॅन आहे. या दोघांची ओळख महेश मांजरेकरांमुळे झाली. बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ म्हणाला, “सलमान सर आणि महेश सर गेल्या अनेक वर्षांपासून खूप चांगले मित्र आहेत, आणि म्हणूनच सलमान सरही मला ओळखू लागले. मी त्यांचा कॉलेजपासूनच खूप मोठा फॅन आहे. मी एकदा फिल्मसिटीत शूट करत होतो आणि नेमके तेव्हाच सलमान सर सुद्धा बिग बॉसचा प्रोमो शूट करत होते. मी त्यावेळी महेश सरांना विचारलं, ‘त्यांना भेटायला जाऊ का?’ ते मला म्हणाले, ‘जा…’ आता त्यांना जा म्हणणं सोपं आहे कारण, त्यांची आधीपासून मैत्री आहे. पण माझ्यासाठी ते ‘द सलमान खान सर’ आहेत. मी जेव्हा प्रत्यक्ष त्यांना भेटलो…ते माझ्याशी खूप छान बोलले. त्यामुळे मलाही जरा बरं वाटलं.”
सिद्धार्थ जाधव पुढे म्हणाला, “सलमान सर त्यानंतर ‘येरे येरे पैसा’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला आले होते. त्यावेळी त्यांनी मला स्टेजवर बोलावलं होतं…मी तेव्हा थोडा बावरलो होतो कारण, सलमान सर खूप मोठं व्यक्तिमत्त्व आहेत. पण, तेव्हा तेजस्विनी पंडित माझ्या बाजूला होती…तिने सांगितलं, ‘अरे जा ते बोलवत आहेत ना…’ हळुहळू आमची छान ओळख झाली. त्यामुळे मी ‘राधे’ सिनेमात काम करण्याचं कारणच सलमान सर होते. मी लंडनला असताना मला ‘राधे’ चित्रपटातील भूमिकेसाठी फोन आला होता. आता ‘राधे’मध्ये भूमिका वगैरे कोणती असेल याचा विचार मी केलाच नाही…म्हटलं भूमिका गेली उडत…कारण, सलमान सरांबरोबर काम करणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. पहिल्यापासून त्यांना बघत मी मोठा झालोय आणि अशा माणसाबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणं, एका फ्रेममध्ये दिसणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. त्यामुळे ‘राधे’साठी मी लगेच होकार दिला होता.”
“बॉलीवूडचे दिग्गज जेव्हा आपल्या कामाचं कौतुक करतात तेव्हा फार छान वाटतं. कारण, या सगळ्याचं श्रेय माझ्या मराठी इंडस्ट्रीला जातं. मराठी रंगभूमी, मराठी सिनेमांमध्ये मी जे काही काम केलंय त्यामुळेच मी एक चांगला अभिनेता होऊ शकलो. मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे जेव्हा कधी असं कौतुक होतं, तेव्हा मला माझ्या मराठी इंडस्ट्रीचा अभिमान वाटतो.” असं सिद्धार्थने सांगितलं.
