Siddharth Jadhav Struggle to Success : गेल्या दोन दशकांपासून सिद्धार्थ जाधवने मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या सिद्धूने रंगभूमीपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. इंडस्ट्रीमधील या २६ वर्षांच्या प्रवासात सिद्धार्थने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये व सुपरहिट नाटकांमध्ये काम केलं आहे. आजच्या घडीला सिद्धार्थ जाधवचं नाव घराघरांत लोकप्रिय आहे. पण, एक काळ असा होता…जेव्हा सिद्धार्थने अतिशय कष्ट करून दिवस काढले होते. झोपडपट्टीत संपूर्ण बालपण गेल्यावर…अभिनेत्याने एके दिवशी आपण आपल्या आई-बाबांसाठी हक्काचं घर नक्की घ्यायचं, असं स्वप्न पाहिलं होतं. मोठ्या जिद्दीने त्याने हे स्वप्न पूर्ण केलं आहे.

सिद्धार्थ जाधवने मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याचा आजवरचा प्रवास थोडक्यात सांगितला आहे. सिद्धार्थ सांगतो, “आम्ही आधी झोपडपट्टीत राहायचो…त्याठिकाणी एक लहानसा स्टेज सुद्धा होता. आमच्या वस्तीत सगळे सणवार मोठ्या जल्लोषात साजरे केले जायचे. आम्ही सगळे एकत्र बसून प्रोजेक्टरवर सिनेमे पाहायचो. गणेशोत्सवात ११ दिवस ११ चित्रपट पाहायला मिळायचे. ते दिवसच वेगळे होते…एकेदिवशी ‘तेजाब’ सिनेमा लागला आणि सगळी मुलं ओळीने पुढे बसली होती. ज्यावेळी ‘एक-दोन-तीन…’ गाणं आणि माधुरीचा डान्स सुरू झाला… तेव्हा सगळे लोक नाचू लागले. प्रोजेक्टरवर सगळेजण पैशांची नाणी उडवू लागले. तिच नाणी आम्ही जमा केली…जेणेकरून त्यादिवशीचे तिकिटाचे पैसे वसूल झाले. ती मजा वेगळीच होती. प्रोजेक्टर लागणार हे समजल्यावर आम्ही सगळे वेळेत जेवायचो. घरचे मला जागा पकडण्यासाठी पुढे पाठवायचे. एक कोणीतरी रस्त्यावरचे दिवे असतात बघा…ती लाइट सुरू ठेवण्यासाठी त्या खांबावर चढायचा. आता ते सगळं राहिलं नाही…आपल्याला आता फोनवर सहज चित्रपट पाहता येतात.”

पोलीस अधिकारी व्हायचं होतं…

सिद्धार्थने या संभाषणादरम्यान बालपणी त्याला पोलीस अधिकारी व्हायचं होतं ही आठवण सांगितली. तो म्हणाला, “माझे बाबा एका रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून काम करायचे. पण, मला पोलीस फोर्समध्ये जायचं होतं. कारण, तेव्हा माझ्या एरियातील माझे सगळे मित्र पोलिसात भरती झाले होते, त्यामुळे माझीही पोलीस अधिकारी व्हायचं अशी इच्छा होती.”

नव्या घराच्या दारावर वडिलांच्या नावाची पाटी लावायची….

“दादरमध्ये हक्काचं घर घ्यायचं हे माझं स्वप्न होतं, कारण तिथेच माझा जन्म झाला…त्याचठिकाणी मी मोठा झालो. माझ्या वडिलांचे मित्र आहेत त्यांच्या घरी आम्ही आधी राहायचो. आमचं स्वत:चं घर नव्हतं…त्यामुळे आपलं हक्काचं घर घ्यायचं हे स्वप्न मी तेव्हाच पाहिलं होतं. ते स्वप्न २६ वर्षांनी पूर्ण झालंय. हक्काचं घर घेऊन दारावर वडिलांच्या नावाची पाटी लावायची…हे स्वप्न मी पाहिलं होतं आणि ते पूर्ण झालंय… माझे बाबाही यामुळे प्रचंड आनंदी आहेत”, अशा भावना यावेळी सिद्धार्थ जाधवने व्यक्त केल्या.