Siddharth Jadhav Animal Marathi Natak: मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव हा आठ वर्षांनंतर रंगभूमीवर परत आला आहे. सिनेविश्व आणि बॉलीवूड गाजवल्यानंतर सिद्धार्थ पुन्हा एकदा नाटकांकडे वळला आहे. सिद्धार्थ जाधवचे ‘ॲनिमल’ हे नवेकोर नाटक सध्या धुमाकूळ घालत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ॲनिमलचे प्रयोग यशस्वीरित्या पार पडत असून तो सध्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये प्रयोग करत आहे. गुरुवारी ॲनिमल नाटकाचा प्रयोग नांदेडमध्ये पार पडला. महाराष्ट्रभर प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधवसह ॲनिमल टीमने नांदेड येथील गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून सिद्धार्थ जाधवने याचे काही फोटो शेअर केले आहेत.
अभिनेता सिद्धार्थ जाधव याने नांदेडमधील सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथे दर्शन घेतले. शीख समुदायामध्ये या गुरुद्वाराचे अत्यंत विशेष पवित्र स्थान आहे. शिखांचे दहावे गुरु असलेले गुरु गोविंद सिंग यांनी येथेच १७०८ साली देहत्याग केला होता, त्यामुळे हे स्थान शीख धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते.
इन्स्टाग्रामवर फोटो केले शेअर
सिद्धार्थ जाधवने टीम ॲनिमलसह येथे भेट देऊन आशीर्वाद घेतले. इन्स्टाग्रामवर पोस्ट करून सिद्धार्थने लिहिले आहे की, शांतता आणि ऊर्जा…यावेळी सिद्धार्थने शीख धर्माच्या नियमांचे आदराने पालन करून भक्तीभावे दर्शन घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या गळ्यामध्ये पूजा केल्याचा हारदेखील दिसून येतो आहे.
निर्मिती क्षेत्रात सिद्धार्थचे पहिले पाऊल
अभिनेता सिद्धार्थ जाधवसह त्याची टीमदेखील गुरुद्वारामध्ये गेली होती. यावेळी नाटकामध्ये काम करणारे इतर कलाकारदेखील उपस्थित आहेत. ७ तारखेला नांदेडमध्ये कुसूम सभागृह येथे प्रयोग पार पडला. त्यापूर्वी कलाकारांनी गुरुद्वाराला भेट दिली. ॲनिमल हे नाटक सिद्धार्थ जाधवसाठी अत्यंत जिव्हाळ्याचे आहे. तब्बल आठ वर्षांनंतर सिद्धार्थ हा नाटकांमध्ये परतला असून हे त्याचे निर्मिती क्षेत्रातील पहिले पाऊल आहे. सिद्धार्थ जाधवने आई-वडिलांच्या स्मरणार्थ ‘ताराराम’ ही निर्मिती संस्था स्थापन करून ॲनिमल ही पहिली निर्मिती केली आहे. त्याचबरोबर नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.
काय आहे नाटकाची कथा?
‘ॲनिमल’ हे नाटक दत्तू या पात्राभोवती फिरते आहे. छोट्या गावातून मुंबई या स्वप्नांच्या शहरामध्ये आलेल्या दत्तूची गोष्ट या नाटकातून मांडली आहे. त्याचे स्वप्न, इच्छा, आकांशा, वास्तव, स्पर्धा आणि तणाव याचे जिवंत उदाहरण या नाटकातून मांडण्यात आले आहे. शहरी भागांमध्ये असणारा तणाव आणि त्यातून होणारी घुसमट याचे वास्तवदर्शी चित्र मांडण्यात आले आहे. मुंबईमध्ये झालेल्या यशस्वी प्रयोगानंतर आता ग्रामीण भागामध्येदेखील नाटकाचे प्रयोग हाऊसफुल होत आहेत.
