मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखलं जातं. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. वैयक्तिक आयुष्यात सिद्धार्थने मे २००७ मध्ये तृप्ती अक्कलवारशी प्रेमविवाह केला. काही वर्षांपूर्वी तृप्तीने सोशल मीडियावर तिचं सासरचं जाधव हे आडनाव बदलून फक्त तृप्ती अक्कलवार असं नाव अपडेट केलं होतं. याबद्दल सर्वत्र चर्चा रंगल्या होत्या. पण, ‘तृप्ती अक्कलवार’ अशी ओळख सांगण्यामागे एक खास कारण आहे. याबाबत अभिनेत्याच्या पत्नीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सविस्तर खुलासा केला आहे.
तृप्ती ‘लोकमत सखी’च्या मुलाखतीत म्हणाली, “माझ्या आयुष्यात कोव्हिडमुळे बरेच बदल झाले. ती एक वेगळीच फेज होती…मी आणि सिद्धू तेव्हा २४ तास घरात एकत्र असायचो आणि त्यावेळी आमची छोटी-मोठी अशी भांडणं होत होती. यादरम्यान एके दिवशी त्याने बँकेत फोन केला. आमचं तेव्हा बँकेत जॉईन अकाऊंट होतं. तो बँकवाल्यांना म्हणाला, मी सिद्धार्थ जाधव बोलतोय…यापुढे तुम्ही मी चेक केल्याशिवाय कोणताही चेक पास करायचा नाही किंवा तुम्ही कोणाला पैसे काढायला द्यायचे नाहीत. हे सगळं मी किचनमधून ऐकत होते. त्यामुळे साहजिकच मला थोडा धक्का बसला. कारण, २०२० पर्यंत सिद्धूचं सगळं मी सांभाळत होते.”
तृप्ती पुढे म्हणाली, “घर त्याच्या नावावर होतं. गाड्या त्याच्या नावावर होत्या…माझं फक्त एवढंच होतं की, मी आई-बाबांच्या विरोधात जाऊन ज्या माणसाबरोबर लग्न केलंय. तो आयुष्यात खूप यशस्वी झाला पाहिजे. म्हणूनच मी २०१३ मध्ये नोकरी वगैरे सोडली होती. तो माझा स्वत:चा निर्णय होता. त्यानंतर मी त्याच्या कामात लक्ष देत होते. पण, सिद्धूचा बँकेतला तो फोनकॉल ऐकल्यावर माझं असं झालं की, आपल्याला बिनपगाराच्या नोकरीवरून कोणीतरी काढून टाकलंय. मग मी सुद्धा त्याला सांगितलं…आजनंतर मी तुझं काहीच सांभाळणार नाही. यानंतर मी भरपूर रडले.”
“तेव्हा मी खूप जास्त इमोशनल झाले होते. पण, आज मी त्या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहते. या सगळ्यानंतर मी जरा विचार केला की, आपण आयुष्यात पुढे काय केलं पाहिजे. कारण, नोकरी सोडून मला खूप वर्ष झाली होती. मी अनेकांना फोन करून जॉबसाठीही विचारलं होतं. पण, नोकरी मिळाली नाही कारण, अर्थात सर्वांना हेच वाटत होतं…अरे ही सिद्धार्थ जाधवची बायको आहे हिला नोकरीची काय गरज आहे? २०२० नंतर मी ठरवलं की, मला स्वत:ला सिद्ध करायचं आहे. तो संघर्ष माझा माझ्यासाठी होता. सिद्धू सुद्धा तेव्हा सेट होता आणि मग मी ठरवलं आता आपण स्वत:कडे लक्ष दिलं पाहिजे.”
“२०२० नंतर मी ठरवलं की, यापुढचा प्रवास हा तृप्ती अक्कलवार म्हणूनच करायचा. मी सिद्धार्थ जाधवची बायको आहे हे मी खोडू शकत नाही आणि मला ते खोडायलाही जायचं नाहीये. आजही लोक मला त्याच्या नावाने ओळखतात. पण, आपण कधीच स्वत:ची ओळख विसरली नाही पाहिजे. तुम्ही तुमची ओळख जपा…हे मी माझ्या दोन्ही मुलींना सुद्धा सांगून ठेवलं आहे. २०१३ मध्ये जर मी नोकरी सोडली नसती…तर कदाचित आज माझं आयुष्य पूर्ण वेगळं असतं. त्यामुळे मी प्रत्येक बाईला सांगते तुम्हाला ५ हजाराची असो किंवा दहा हजाराची नोकरी असो…पण ती नक्की करा. कारण ते दहा हजार खर्च करताना तुम्हाला कोणाला उत्तर द्यावं लागणार नाही.” असा सल्ला तृप्तीने महिलांना दिला आहे.
