‘अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमधून सिद्धार्थ जाधवने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. चित्रपट असो किंवा रंगभूमी सिद्धूच्या अभिनयाचं नाणं नेहमीच खणखणीत वाजतं. एवढंच नव्हे तर गेल्या काही वर्षात सिद्धार्थने बॉलीवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविधांगी भूमिका साकारून तो नेहमीच प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत असतो. सध्या सिद्धार्थ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

सिद्धार्थ जाधवचा राष्ट्रीय पातळीवर एका महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. यासंदर्भात त्याने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. ‘दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल २०२४’ मध्ये सिद्धार्थला ‘बालभारती’ चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा ज्युरी विशेष पुरस्कार देण्यात आला आहे.

हेही वाचा : “त्याला फोटो बिटो आवडत नाहीत”, अवघ्या १९ व्या वर्षी झालेलं मृणाल कुलकर्णींचं लग्न, पतीसाठी लिहिली खास पोस्ट

सिद्धार्थ जाधवची पोस्ट

BEST ACTOR (JURY ) बालभारती
नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या चौदाव्या ‘दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल २०२४’ मध्ये आमचा सिनेमा ‘बालभारती’ यासाठी मला जुरींकडून ‘बेस्ट अ‍ॅक्टर’ हा पुरस्कार मिळाला…
मनापासून आनंद होतो… ‘बालभारती’ सिनेमातल्या माझ्या कामाचं राष्ट्रीय पातळीवर कौतुक केलं जातंय… काम करण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेता त्यावर कोणीतरी कौतुकाची थाप देत आहे… देशभरातले सगळे रिजनल सिनेमे यात सहभागी झाले होते आणि त्यातून बालभारतीसाठी award मिळणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे… आमचे producer @official_sphereorigins
सुजय सर ,कोमल मॅम, संपूर्ण टीम आणि मनापासून आभार मानतो मी आमचे दिग्दर्शक लेखक @nitinnandan… लव्ह यू टीम!

हेही वाचा : कालीन भैय्या आणि गुड्डू पंडितची आतुरतेने पाहताय वाट, तर ‘मिर्झापूर ३’च्या प्रदर्शनाची तारीख दडलीये ‘या’ फोटोमध्ये, शोधा

दरम्यान, तेजस्विनी पंडित, अभिजीत खांडकेकर, सुकन्या मोने, प्रथमेश परब या कलाकारांनी कमेंट्स करत सिद्धार्थवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय त्याच्या ‘बालभारती’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. मुलांना इंग्रजी बोलता यावं या पालकांच्या हट्टापायी या माध्यमांत प्रवेश घेतला जातो. यानंतर मुलांच्या भविष्यावर याचा कसा परिणाम होतो हे या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. सध्या सिद्धार्थचं सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. लवकरच तो ‘सिंघम अगेन’ या रोहित शेट्टीच्या बॉलीवूड चित्रपटात झळकणार आहे. येत्या ऑगस्टमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.