Marathi Singer Shares Post For Kedar Shinde : ‘अगंबाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘झापुक झुपूक’ व ‘महाराष्ट्र शाहीर’सारख्या सिनेमा आणि गाजलेल्या नाटकांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे लोकप्रिय मराठी दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे. दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय असलेले केदार शिंदे त्यांच्या मैत्रीसाठीही ओळखले जातात. मराठी कलाविश्वात केदार शिंदेंच्या मित्र-मैत्रिणींचे किस्से आणि आठवणी सर्वश्रुत आहेत. अशातच केदार शिंदेंच्या एका खास मैत्रिणीनं त्यांच्या मैत्रीबद्दलची पोस्ट शेअर केली आहे, ही मैत्रीण म्हणजे वैशाली सामंत.
लोकप्रिय गायिका वैशाली सामंत ही केदार शिंदेंची खास मैत्रीण आहे. या दोघांमधील मैत्री सर्वांनाच माहीत आहे. दोन दशकांपासून या जोडीने प्रेक्षकांना अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. अशातच वैशाली सामंतने केदार शिंदेंसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. केदार यांच्याबरोबरचा फोटो शेअर करीत तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या पोस्टमध्ये वैशाली म्हणते, “ही पोस्ट खास तुझ्यासाठी. आपल्या सांगीतिक मैत्रीसाठी. तुझ्या प्रत्येक चित्रपटाचा/मालिकेचा महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे त्यातलं संगीत. तुझ्या कल्पनेतील गाण्याकडे तू संगीतकाराला, गीतकाराला आणि मग गायकाला कसा हात धरून नेतोस. मग शेवटी पूर्ण गाणं समोरं आल्यावर कळतं की, याला काय म्हणायचं होतं.”
त्यानंतर ती म्हणते, “गेली २० वर्षं तू मला या जिव्हाळ्याचा एक हिस्सा दिला आहेस. छमछम, कोंबडी, आभास हा, श्रीमंत दामोदर पंत, खो-खो, गलगले… लिस्ट मोठी आहे आणि महत्त्वाचीही आहे. गायिका व संगीतकार म्हणून तू जो विश्वास ठेवला आहेस, त्याबद्दल काय बोलू…. आभार हा शब्द मैत्रीत नसतो. पण तरीही हे म्हणेन की, माझ्या सांगीतिक वाटचालीमध्ये तुझा महत्त्वाचा वाटा आहे. आता २०२५ संपता संपता तुझं नवीन ‘अगं अगं सूनबाई’ हे गाणं गायचा योग आला. प्रेक्षकांनाही ते आवडतंय.”
दरम्यान, केदार शिंदेंच्या नव्या आगामी सिनेमाचं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. येत्या नवीन वर्षात केदार शिंदेंचा ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यातलं पहिलं शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, ते गाणंसुद्धा वैशालीनंच गायलं आहे. त्याबद्दल तिनं म्हटलंय, “नवीन वर्षी सरप्राईज देणार आहेस, त्याबद्दल उत्सुकता आहे. आपलं हे सांगीतिक नातं असंच पुढे जावो, हीच स्वामींचरणी प्रार्थना.”
वैशालीनं शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनीसुद्धा लाइक्स आणि कमेंट्सद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. केदार शिंदेंची मुलगी सना शिंदेनंही या पोस्टवर हार्ट इमोजीद्वारे तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
