Smita Jayakar : मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांनी आजवर अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. ‘सरफरोश’, ‘अस्तित्व’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ या चित्रपटांमध्ये स्मिता जयकर यांनी सलमान खान, शाहरुख खान, ऐश्वर्या राय यांसारख्या स्टार कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर केलीये. मराठीपेक्षा हिंदी सिनेमांमध्येच त्या जास्त झळकल्या. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्मिता जयकर यांनी इंडस्ट्रीमधील ग्रुपिझम, प्रोफेशनलिझम याबाबत भाष्य केलं आहे.
स्मिता जयकर यांनी ‘आरपार’ युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, “हिंदीमध्ये मी जी काही कामं केली, त्यावरून मी एक सांगते, ते लोक मराठी इंडस्ट्रीपेक्षा जास्त प्रोफेशनल आहेत. मानधनाच्या दृष्टीने वगैरे सगळ्या बाबतीत हिंदी इंडस्ट्री जास्त प्रोफेशनल आहे. मराठीत ग्रुपिझम खूप असतं, असं माझ्या साधारण लक्षात आलं आहे. हिंदीत असं नाहीये…जर त्यांना एखाद्या कलाकाराबरोबर काम करायचं असेल, तर ते करणारच! ग्रुपिझम हा प्रकार हिंदी इंडस्ट्रीत तेवढा नाहीये.”
“मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाही आहेत किंवा यातून काही गैरसमजही करून घेऊ नका. पण, मला असं वाटतं मराठी इंडस्ट्रीत इगो खूप आहे…मी त्याच्याबरोबर कशाला काम करू? अशी एक धारणा असते. अर्थात हे आताच्या पिढीमध्ये नाहीये. मी आधीचं सांगतेय. आमच्या पिढीबद्दल मी सांगतेय…पण, हिंदीत असा अनुभव आला नाही. हिंदीत कोणीही आर्टिस्ट कोणतंही काम करतो असं एकंदर माझं मत आहे.” असं स्मिता जयकर यांनी सांगितलं.
त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये बहुतांश नेटकऱ्यांनी स्मिता जयकर यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. याशिवाय अभिनेता पुष्कर जोग या व्हिडीओवर कमेंट करत लिहितो, “हो मॅम…तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. मी माझ्या सर्व पॉडकास्ट, मुलाखतींमध्ये हीच गोष्ट सांगत आलो आहे.”

दरम्यान, स्मिता जयकर मराठी सिनेमांमध्ये काम करण्याविषयी म्हणाल्या, “आता मला या इंडस्ट्रीत आता ३५-३६ वर्षे झालेली आहेत आणि मी मराठीत मोजून १० सिनेमे देखील केलेले नाहीयेत. मला सिनेमांसाठी अप्रोच केलं जात नाही, त्यांच्या डोक्यात काय आहे मला खरंच माहिती नाही. मी हे प्रत्येकवेळा बोलले आहे की, मराठी दिग्दर्शक, निर्माते मला सिनेमे ऑफर करत नाहीत. कदाचित माझ्याबद्दल गैरसमज झालेला असावा किंवा त्या लोकांनी मनात एक ग्रह तयार करून ठेवला असेल.”
