‘अस्तित्व’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ अशा एकापेक्षा एक सुपरहिट हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच स्मिता जयकर. हिंदी सिनेविश्वात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, त्या तुलनेत त्यांनी मराठीत फारसं काम केलेलं नाहीये. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्मिता जयकर यांनी याबद्दल खंत व्यक्त करत मराठीत भूमिकाच ऑफर झाल्या नाहीत असं स्पष्ट मत मांडलं आहे.
स्मिता जयकर ‘आरपार’ युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, “मराठीमध्ये माझ्याबद्दल एक मत तयार झालंय ते म्हणजे..ही हिंदीमध्ये काम करते. त्यामुळे बऱ्याचवेळा मराठी इंडस्ट्रीत मला भूमिका ऑफरच केल्या जात नाहीत. सर्वांना खोटं वाटेल पण, आता मला या इंडस्ट्रीत आता ३५-३६ वर्षे झालेली आहेत आणि मी मराठीत मोजून १० सिनेमे देखील केलेले नाहीयेत. मला सिनेमांसाठी अप्रोच केलं जात नाही, त्यांच्या डोक्यात काय आहे मला खरंच माहिती नाही. मी हे प्रत्येकवेळा बोलले आहे की, मराठी दिग्दर्शक, निर्माते मला सिनेमे ऑफर करत नाहीत…पैसे वगैरे हा भाग नंतरचा…आता मी काहीही मानधन मागेन असं तर होणारच नाहीये. कारण, मलाही सगळी आर्थिक गणितं माहिती आहेत. कदाचित माझ्याबद्दल गैरसमज झालेला असावा किंवा त्या लोकांनी मनात एक ग्रह तयार करून ठेवला असेल.”
अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “सुरुवातीच्या दिवसांत मी मराठी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. पण, मी हिंदीत कामाला सुरुवात केल्यावर मराठीतून काम मिळणं आपोआपच बंद झालं….सिनेमा तर नाहीच! मी ‘सत्वपरीक्षा’ या मराठी सिनेमात बऱ्याच वर्षांपूर्वी काम केलं होतं. त्या चित्रपटात मी खलनायिकेची भूमिका केली होती. मला त्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता. तो चित्रपट मी मराठीत काम केलेल्या सर्वात चांगल्या सिनेमांपैकी एक होता. तर, मी एकंदरच मराठीत फार कमी आणि मोजकंच काम केलं आहे.”
“मला फार खंत वाटायची की, मी मराठी अभिनेत्री असूनही मराठी निर्माते, दिग्दर्शक मला कामासाठी, एखाद्या भूमिकेसाठी का विचारत नाहीत? पण, ठिके! आता त्यांच्या मनात काय आहे, मी सांगू शकत नाही.” असं स्मिता जयकर यांनी सांगितलं.
