Smriti Mandhana Wedding : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मती मानधना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांचा लग्नसोहळा २३ नोव्हेंबरला पार पडणार होता. मात्र, हे लग्न स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे रद्द करण्यात आलं आहे. स्मृतीच्या मॅनेजरने रविवारी लग्नसोहळा तात्पुरता रद्द झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. पण, याचदरम्यान स्मृतीने लग्नासंदर्भातील पलाशबरोबरचे फोटो इन्स्टाग्रामवरून डिलीट केल्याने सोशल मीडियावर सध्या विविध चर्चांना उधाण आलं आहे.
पलाशने काही दिवसांपूर्वीच स्मृतीला डी वाय पाटील स्टेडियममध्ये प्रपोज केलं होतं. हा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवरून हटवला आहे. याशिवाय दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये स्मृतीने तिच्या क्रिकेट संघातील मैत्रिणींना साखरपुडा झाल्याचं सांगितलं होतं. हा व्हिडीओ सुद्धा स्मृतीने डिलीट केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर स्मृती-पलाशच्या लग्नासंदर्भात विविध चर्चा होऊ लागल्या आहेत. यानंतर पलाशची बहीण पलक मुच्छलने कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करा अशी विनंती दोघांच्याही चाहत्यांना केली होती. आता मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी देखील स्मृती मानधनाच्या लग्नाबाबत होणाऱ्या चर्चांवर प्रतिक्रिया देत “हे सगळं करून काय साध्य होणार आहे?” असा सवाल नेटकऱ्यांना केला आहे.
सलील कुलकर्णी म्हणतात, “मित्रांनो आपण असे का वागतो? स्मृती मानधनाच्या आयुष्यात जे काही झालं असेल ते ती बघेल…तिच्या जवळची लोक बघतील. आपल्या घरातील मुलगी असती किंवा बहीण असती तर आपण असं बोललो असतो का? काय हौस आहे हे सांगण्याची की, सर्वांपेक्षा जास्त आपल्याला माहितीये… सर्वांच्या आधी हे आपल्याला माहितीये…आपल्याला इतकी घाई कशाला? सतत बातम्या पसरवण्याची…काहीही माहिती नसताना वाढवून सांगण्याची…हे काय आहे? आपण थोडं समजूतदारपणे वागलं पाहिजे. आपल्या घरचं कोणी असतं तर आपण असं नसतं केलं…बरं या गोष्टी तुम्हाला आधी समजल्या तर असं काय साध्य होणारे? जरा आपआपलं बघुयात ना…”
सलील कुलकर्णी हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहितात, “प्लीज, स्मृतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करणं थांबवा…तिला तिचं आयुष्य जगू द्या!” त्यांच्या या व्हिडीओवर असंख्य कमेंट्स देखील आल्या आहेत. “अगदी मनातलं बोललात सर…लोकांना काय झालंय काही कळत नाहीये”, “लोक काहीही लिहीत सुटलेत ती आपली उपकर्णधार आहे उगाच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा करू नये” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
