Snehal Tarde gets emotional: ‘फुलवंती’, ‘धर्मवीर’, ‘धर्मवीर २’, ‘चौक’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘व्हेटिंलेटर’, ‘देऊळ बंद’, ‘चिंटू’ अशा अनेक चित्रपटांद्वारे स्नेहल तरडे यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. लवकरच त्या देऊळ बंद २ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
नुकताच ‘देऊळ बंद २- आता परीक्षा देवाची’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मोहन जोशी, स्नेहल तरडे, प्रवीण तरडे यांच्याबरोबरअनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसत आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडेंनी सांभाळली आहे. तर, जयश्री वाणी, कैवल्य वाणी, जुईली वाणी यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या टीझर लॉंचवेळी अनेक कलाकार उपस्थित होते.
“आज मी आयुष्यात पहिल्यांदा…”
टीझर लाँचवेळी स्नेहल तरडेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या, “आज मी आयुष्यात पहिल्यांदा अक्कलकोटला आलेली आहे. चित्रपटाच्या निमित्तानं स्वामींनी मला इथे बोलावून घेतले आहे. त्यांच्या या कृपेमुळे मी अत्यंत भारावून गेलेले आहे. बोलताना कदाचित डोळे भरून येतील. मी स्वामींची कृपा आता शब्दांत कशी व्यक्त करू? मला कळत नाही. त्यांच्या कृपेनं, त्यांच्या प्रेरणेनं काम करण्याची शक्ती मिळाली. त्यांच्या कृपेनं हा चित्रपट पूर्ण होऊ शकला. त्यांचं अस्तित्व आजूबाजूला आहे, हे सतत मला जाणवत होतं.”
स्नेहल तरडे असेही म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या सर्व स्त्रियांना आम्ही हा चित्रपट समर्पित करीत आहोत. अशा स्त्रिया ज्या आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी आपलं सर्वस्व पणाला लावून लढत असतात, कष्ट करत असतात. त्यांच्या कष्टांची कोणी दखल घेवो वा न घेवो, त्यांना फरक पडत नाही. त्यांच्या कष्टांचा मोबदला मिळो वा न मिळो, त्यांना फरक पडत नाही. त्या आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी लढत असतात. शेवटच्या श्वासापर्यंत त्या लढत असतात. मुलांबाळांसाठी कष्ट सोसत असतात. अशा सर्व स्त्रियांना ‘देऊळ बंद २- आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट समर्पित करीत आहोत. स्वामींचे खूप खूप आभार. मला ही भूमिका साकारण्याची त्यांनी संधी दिली, काम करण्याची प्रेरणा दिली, शक्ती दिली.”
पुढे त्या म्हणाल्या, “चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते कैलाश वाणी व जयश्री वाणी तुमचे खूप आभार, तुम्ही मला ही संधी दिली”, असे म्हणत स्नेहल तरडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.
‘देऊळ बंद २’च्या टीझरमध्ये स्नेहल तरडे यांचे पात्र स्वामी समर्थांना आव्हान देत असल्याचे पाहायला मिळाले. या सिनेमात अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. तसेच, टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांनी कमेंट्स करीत चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे आहेत. हा सिनेमा २१ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, ‘देऊळ बंद’प्रमाणेच ‘देऊळ बंद २’लादेखील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
