अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता गश्मीर महाजनी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘फुलवंती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली ‘फुलवंती’ ही अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण तरडे यांच्या पत्नी स्नेहल तरडेने केलं आहे. ‘फुलवंती’ चित्रपटाच्या निमित्ताने स्नेहल तरडेने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. अशातच नुकतीच स्नेहल तरडेने एक मुलाखत दिली. ज्यामध्ये तिने चित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल सांगितलं.
‘राजश्री मराठी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलला स्नेहल तरडेनी मुलाखत दिली. यावेळी तिला विचारलं की, आता दिग्दर्शका हा नवा टॅग नावापुढे लागतोय? तर कसं वाटतंय? यावर स्नेहल तरडे म्हणाली, “सध्या शिकत आहे. आताशी सुरुवात झाली आहे. त्यामुळे मी दिग्दर्शिका आहे, असं लेबल मी स्वतःला तरी लावून नाही घेतलंय. कारण मी अजून शिकत आहे. पण एक आहे प्रवीणला खूप वर्ष पाहतेय. कॉलेजमध्ये असताना काही एकांकिका दिग्दर्शित केलेल्या आहेत. प्रवीण बरोबर राहून राहून काही गोष्टी आपसुक घेतल्या गेलेल्या आहेत. त्या जास्तीत जास्त प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला आहे.”
पुढे स्नेहल तरडे म्हणाली की, मी इतकी नशीबवान आहे की माझ्या घरात इतका मोठा दिग्दर्शक आहे; ज्याच्याकडून आयुष्यभर कितीही शिकत राहिलं तरी कमी पडणार आहे. इतका तो टॅलेंटेड आहे. त्यामुळे अशा व्यक्तीची जीवनसाथी आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो आणि हा माझ्यासाठी एक प्लस पॉइंट आहे.
‘फुलवंती’ चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासाठी कोणी जास्त प्रोत्साहन दिलं? असं विचारल्यानंतर स्नेहल म्हणाली, “कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यात तिच्या घरातले तिला पाठबळ देणारे पुशिंग पॉइंट असतात. त्यामुळे प्रवीण असेल, माझ्या मैत्रीणी असतील; ज्या मला बऱ्याच वर्षांपासून बघतायत. कारण मी अनेक वर्ष घरी थांबले होते. जे मला कॉलेजपासून ओळखतात, ज्यांना माझी क्षमता माहितीये त्या वाटत बघत होत्या मी कधी काय करते. त्या माझ्या पुशिंग पॉइंट आहेत. माझा मुलगा पुशिंग पॉइंट आहे आणि माझी आई खूप मोठी सपोर्ट सिस्टम आहे. या सगळ्यांचं मिळून जो काही हातभार लागतो. तेव्हा आपण एक पाऊल पुढे टाकू शकतो.”
हेही वाचा – Video: “तो आता गजनी झालाय”, निक्की आणि अभिजीतचा खेळ पाहून सूरजचा टोमणा, नेमकं काय घडलं? पाहा
“मी दिग्दर्शिका होण्यात माझ्या एकटीचं श्रेय नाहीये. म्हणून मी म्हटलं लेबल लावलेलंच नाहीये, दिग्दर्शिका आहे. कारण आपल्या यशामध्ये आपल्या एकट्याचा वाटा कधीच नसतो. प्रत्येक छोटा घटक आपल्या यश आणि अपयशाला हातभार लावत असतो. काहीतरी इनपुट देत असतो. काहीतरी शिकवून जात असतो. त्यामुळे यश मिळालं तर हे सगळेजण जबाबदार असतील,” असं स्नेहल तरडे म्हणाली.