Sonalee Kulkarni Brother Atul Kulkarni’s Wedding : मराठी कलाविश्वाची ‘अप्सरा’ म्हणजे सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या भावाच्या लग्नामुळे चर्चेत आहे. सोनालीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने अन् नृत्य कौशल्याने तिने कायमच सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. सोनाली गेल्या काही दिवसांपासून आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवतेय आणि यामागचं कारण म्हणजे भावाचं लग्न. अभिनेत्रीच्या घरी गेले काही दिवस तिच्या भावाची लगीनघाई सुरू होती.
सोनाली कुलकर्णीचा सख्खा भाऊ अतुल कुलकर्णी नुकताच नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नसोहळ्याचे फोटो अन् व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनालीने आपल्या भावाच्या लग्नात मनसोक्त एन्जॉय केल्याचं पाहायला मिळालं.

भावाच्या लग्नात अभिनेत्रीने सुंदर मेहंदी काढली होती. या व्हिडीओमध्ये सोनालीचा पती कुणाल सुद्धा पाहायला मिळतोय. शेवाळी रंगाचा सिंपल लेहेंगा ड्रेस अन् त्यावर मोत्याचा फोर लेयर नेकलेस या लूकमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसतेय. तर, अभिनेत्रीच्या भावाने लग्न लागताना ऑफ व्हाइट रंगाची सुंदर शेरवानी घातली होती.
सोनालीच्या भावाच्या लग्नाला तिची जवळची मैत्रीण आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर, निर्माता सुहृद गोडबोले, ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर असे अनेक कलाकार सुद्धा उपस्थित होते.
सोनालीचा सख्खा भाऊ अतुल कुलकर्णीबद्दल सांगायचं झालं तर, त्याचंही कलाविश्वाशी जवळचं कनेक्शन आहे. अतुल डान्सर आणि मॉडेल म्हणून ओळखला जातो. त्याचं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत असतं. याशिवाय सोनाली अन् अतुलचे फोटोही व्हायरल होतात. रक्षाबंधन, भाऊबीज, वाढदिवसानिमित्त ही भावंडं एकमेकांसाठी खास पोस्ट लिहित असतात. तसेच सोनाली आणि तिचा भाऊ दरवर्षी घरच्या घरी गणपती बाप्पाची घरगुती इको फ्रेंडली मूर्तीही घडवतात. यावरून त्यांचं बॉण्डिंग किती छान आहे याची प्रचिती येते.
दरम्यान, सोनाली कुलकर्णीच्या भावावर संपूर्ण मनोरंजन विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
