Sonalee Kulkarni on Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच तिघी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ६ मार्च २०२६ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याचे सर्व स्तरांवर कौतुक होताना दिसत आहे. सोनाली कुलकर्णीसह या सिनेमात ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर, तसेच अभिनेत्री नेहा पेंडसे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

आता मात्र सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयामुळे नाही, तर तिने केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिचा नवरा, तसेच सहजीवन यांबद्दल वक्तव्य केले.

“जेव्हा मी लग्नाचा गांभीर्याने विचार करायला लागले, तेव्हा मुलगा कसा पाहिजे याबद्दल विचार केला. मला असं वाटलं की, घरी आल्यानंतर आम्ही त्याच त्याच गप्पा मारणार नाही. जो मला जगण्याच्या दुसऱ्या बाजूही दाखवेल. आयुष्य एवढं संकुचित नाही, त्याच्या बऱ्याच बाजू आहेत. म्हणून मी इंडस्ट्रीच्या बाहेरचा मुलगा बघत होते. त्यानंतर मी कुणालला भेटले. त्यानं मला गोष्टींकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन दिला,” असं सोनाली म्हणाली.

पुढे ती म्हणाली, “आम्ही खूप प्रवास करतो. त्यालाही जगातल्या विविध ठिकाणी फिरायला आवडतं. आम्ही ठरवलं आहे की, प्रत्येक वाढदिवसाला एक नवीन देश बघायचा. मी गृहिणी म्हणून संसार आणि घराकडे बघते. आम्ही एकत्र आहोत; परंतु आमच्या आर्थिक गोष्टी वेगवेगळ्या आणि स्वतंत्र आहेत.”

“…तर खूप पैसा कमवणारा असेल”

सोनाली पुढे म्हणाली, “बऱ्याचदा लोकांच्या कमेंट्स येतात किंवा सुरुवातीला खूप कमेंट्स यायच्या की बाहेरच्या देशातला आहे, तर खूप पैसा कमवणारा असेल. शेवटी मुली हेच करतात. तर मला अतिशय अभिमानानं सांगायचं आहे की, मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते. त्यामुळे मी त्याचे पैसे बघितलेलेच नाहीत. मला माहीत नाही की, तो किती कमावतो. नेमके पैसे मला माहीत नाहीत; पण आमच्यात ही चर्चा झाली आहे की मी त्याच्यापेक्षा जास्त कमावते. याचं त्यालाही वावगं वाटत नाही, असुरक्षितता वाटत नाही.”

“मलाही त्यात एक वेगळं वाटत नाही. कारण- एक वेळ अशी येणार आहे किंवा मी ठरवेन की, मला काम करायचं नाही. तेव्हा तोच कमावणार आहे. असे असले तरी आम्ही आर्थिक व्यवहार वेगळे करतो. माझे आणि त्याचे अकाउंट्स वेगळे आहेत. त्यानं आजवर कधी विचारलं नाही की, तू इतके पैसे कमावतेस, तर ते कुठे जातात. आजही माझे अकाउंट्स माझे बाबा सांभाळतात. माझे आर्थिक व्यवहार माझे बाबाच बघतात. त्यामध्ये माझ्या नवऱ्याचा किंवा सासरकडच्यांचा अजिबात हस्तक्षेप नाही.

“लग्नानंतर माझ्या आयुष्यात…”

“लग्नानंतर माझ्या आयुष्यात फार काही बदललं नाही. याचं श्रेय माझ्या सासरच्या लोकांना जातं. तेही तितकेच पुरोगामी विचारांचे आहेत. ते मला असे म्हणत नाहीत की, तू तुझ्या आई-बाबांबरोबर वेळ का घालवतेस? त्यांच्यावर एवढा का खर्च करतेस, त्यांच्याबरोबर का असतेस? मी समतोल साधण्याचा प्रयत्न करते. पण, माझं काम इथे भारतात असल्यानं मला इथे खूप वेळ घालवावा लागतो. जेव्हा लाँग डिस्टन्स असते, तेव्हा थोड्याशा अडचणी असतात. कधी कधी खूप वेळ एकत्र घालवता येत नाही. पण, आम्हाला जो अवकाश मिळतो, त्याचा आम्ही आनंद घेतो. तो जो अवकाश मिळतो, त्यामध्ये तो त्याची कामं करतो. आम्ही जेव्हा एकत्र असतो, तेव्हा आम्ही व्यायाम करतो.”

पुढे ती म्हणाली, “एकत्र व्यायाम करणं ही रिलेशनशिपची सगळ्यात उत्तम गोष्ट आहे. जर तुम्हाला तुमच्यातील बॉण्डिंग वाढवायचं असेल, तर एकत्र व्यायाम करा. त्यामुळे तुम्ही एकमेकांना उत्तमरीत्या पाठिंबा देऊ शकता. जिममध्ये व्यायाम करणं, ही अतिशय रोमँटिक स्पेस असू शकते. ही खरंच प्रत्येक जोडप्यानं अनुभवावी.”