Sonalee Kulkarni On Siddharth Jadhav: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच ‘तिघी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. जिजिविषा काळेने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची खूप चर्चा झाली. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत कथा, दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय या सगळ्याचेच कौतुक केले होते. या सिनेमात सोनालीबरोबरच नेहा पेंडसे आणि ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर प्रमुख भूमिकेत होत्या.

सोनाली आता तिच्या चित्रपटामुळे नाही तर तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. तिने नुकतीच व्हायफळ या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिचे करिअर, तिने घेतलेले निर्णय, तसेच लग्न अशा अनेक बाबींवर वक्तव्य केले आहे. याबरोबरच सिद्धार्थ जाधव व तिच्यात दहा वर्षे अबोला होता असाही खुलासा केला आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे, हे जाणून घेऊ…

“त्याने एका शूटिंगदरम्यान…”

सोनाली कुलकर्णी म्हणाली, “जेव्हा श्रीदेवींचे निधन झाले होते, त्यावेळी माझा अत्यंत जवळचा मित्र आणि मी पुन्हा बोलायला लागलो. म्हणजे आता ही गोष्ट अनेकांना माहीत आहे, कारण- आम्ही दोघेही यावर विविध प्लॅटफॉर्म्सवर बोललो आहे. सिद्धार्थ जाधव हा माझा पहिला सहकलाकार, हिरो आणि मित्र आहे.”

Award Banner

“त्यानंतर आमची मैत्री…”

पुढे ती म्हणाली, “त्याने एका शूटिंगदरम्यान एका फालतू कारणामुळे माझ्याशी बोलणं सोडलं होतं, ते त्याने दहा वर्षे जपलं. तो अबोला त्याने दहा वर्षे टिकवला. मग श्रीदेवींचे अचानक निधन झाले, त्यानंतर त्याला साक्षात्कार झाला की असं कदाचित मी मेलो किंवा ती मेली तर आपल्याला एकमेकांशी बोलायला संधीच मिळणार नाही; तर त्याने अनेक वर्षांनंतर मला फोन केला. तो मला म्हणाला की सगळं जाऊदे, आपण ते विसरूयात. त्यानंतर आमची मैत्री आणखी घट्ट झाली.”

सोनाली म्हणाली, “आयुष्य किती लहान आहे याची जाणीव होण्यासाठी आपण कोणीतरी जायची वाट बघू नये.” सोनाली कुलकर्णी व सिद्धार्थ जाधव यांनी ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा सिनेमा २००७ ला प्रदर्शित झाला होता. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव व सोनाली कुलकर्णीच्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती.

दरम्यान, ‘तिघी’ सिनेमानंतर आता अभिनेत्री कोणत्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.